नागपूर : सक्करदरा उड्डाणपुलावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीसह पुलावरून खाली कोसळलेल्या २२ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थी प्रजीत भीमराव वाहने याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गुरुवारी सकाळी सुमारे १०.१५ वाजता प्रजीत दुचाकीने सक्करदरा उड्डाणपुलावरून जात होता. यावेळी अचानक दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो दुचाकीसह उड्डाणपुलावरून खाली कोसळला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रजीतला तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात वेगामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.




