
नागपूर : शेअर बाजारातून जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागपूरातील अनेक गुंतवणूकदारांना सुमारे २ कोटी ६५ लाख रुपयांनी गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अजनी पोलिसांनी एका दांपत्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास गुन्हे शाखेच्या EOW विभागाकडे देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवि विष्णु मनोहरे आणि त्यांची पत्नी स्वाती रवि मनोहरे (रा. सावित्रीबाई फुले नगर, मानेवाडा रोड) यांनी स्वतःला अनुभवी शेअर ट्रेडर म्हणून दाखवून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. उच्च परताव्याचे आश्वासन देत त्यांनी अनेक नागरिकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.
विश्वास वाढावा यासाठी आरोपी दांपत्याने सेबीचे बनावट परवाने दाखवले. तपासात हे परवाने पूर्णपणे खोटे असल्याचे स्पष्ट झाले.
फिर्यादीसह अनेक गुंतवणूकदारांकडून आरोपींनी एकूण २,६५,१०,००० रुपये स्वीकारले. यापैकी काही गुंतवणूकदारांना मिलाप म्हणून साधारण १ कोटी ३५ लाख रुपये परत करण्यात आले. मात्र उर्वरित १ कोटी २९ लाख ४९ हजार रुपये परत करण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
अजनी पोलिसांनी या दांपत्याविरुद्ध फसवणुकीसंबंधी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा सखोल तपास EOW विभाग करत आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.










