Published On : Sun, Aug 13th, 2023

मनपाच्या १५ हजार विद्यार्थ्यांनी घेतली पंच प्रण प्रतिज्ञा

‘माझी माती माझा देश’ : विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
Advertisement

नागपूर: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ अभियाना अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या शाळांतील १५ हजार विद्यार्थ्यांनी ‘पंच प्रण प्रतिज्ञा’ घेतली. संपूर्ण शहरात उत्साहाने राबविण्यात येत असलेल्या अभियानामध्ये विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी कौतुक केले व मनपाच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे देखील अभिनंदन केले.

नागपूर शहरामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय अशा एकूण १२९ शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये शुक्रवारी (ता.११) सकाळी ११ वाजता सामूहिक ‘पंच प्रण प्रतिज्ञा’ घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी ‘भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसीत राष्ट्र बनिवण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणा-यांप्रति सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू.’ अशी शपथ घेतली.

पन्न्लाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळेमध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी तर दुर्गा नगर हिंदी माध्यमिक शाळेमध्ये अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी विद्यार्थ्यांना ‘पंच प्रण’ शपथ दिली. याशिवाय संजय नगर हिंदी माध्यमिक शाळेमध्ये आमदार श्री. कृष्णा खोपडे यांनी शपथ दिली. तर विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेमध्ये उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे यांनी, वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेमध्ये सहायक आयुक्त श्री. प्रकाश वराडे यांनी, एम.ए.के. आझाद उर्दू माध्यमिक शाळेमध्ये सहायक आयुक्त श्री. हरीश राउत यांनी, जयताळा माध्यमिक शाळेमध्ये सहायक आयुक्त श्री. मिलींद मेश्राम यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळेमध्ये सहायक आयुक्त श्री. महेश धामेचा यांनी, कळमना हिंदी उच्च प्राथमिक शाळेमध्ये सहायक आयुक्त श्री. घनश्याम पंधरे यांनी, पारडी उच्च प्राथमिक शाळेमध्ये सहायक आयुक्त श्री. गणेश राठोड यांच्यासह इतर शाळांमध्ये स्थानिक मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पंच प्रण शपथ दिली.

लक्ष्मीनगर झोनमधील जयताळा माध्यमिक शाळेमध्ये क्षेत्रात रहिवासी असलेल्या वीर योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. ब्रिगेडियर श्री. सुनील गावपांडे, कॅप्टन श्री. संजय खंडारे, सुभेदार श्री. पाठे, सर्जंट श्री. कुलकर्णी, सुभेदार श्री. जे.टी. ब्राम्हणकर, हवालदार श्री. इंदरवाल सामकुवर, सर्जंट श्री. करुणाकर कोरके, हवालदार श्री. गिरीश सेठे, सर्जंट श्री. ज्ञानेश्वर मोहोड, श्री. संतोष काळे, सर्जंट श्री. गंगथळे, सर्जंट श्री. ढोमणे आदी वीरांना लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त श्री. मिलींद मेश्राम यांनी मनपाचा मानाचा दुपट्टा, सन्मानचिन्ह शाल आणि श्रीफळ देउन सन्मानित केले. यावेळी सहायक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे, शाळा निरीक्षक श्रीमती अश्विनी फेड्डेवार, शाळा निरीक्षक श्री. धनंजय जाधव आदी उपस्थित होते.