ब्रॉडगेज मार्गावरील मानवरहित रेल्वे फाटकांचा प्रश्न निकाली, ४० टक्के अपघात रेल्वे फाटकांवर, दपूमरे झोन मधील ५४ फाटक पडणार
नागपूर : देशात होणाºया एकूण रेल्वे अपघातांपैकी ४० टक्के अपघात रेल्वे फाटकांवर होत असतात. ही बाब लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने देशभरातील दिड हजार रेल्वे फाटक कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनमधील ५४ फाटक बंद केले जाणार असून नागपूर विभागात १५ फाटकांचा समावेश आहे. वर्षभरात १५ फाटक बंद होतील.
भारतीय रेल्वेने देशभरातील ब्रॉडगेज मार्गावरील मानवरहित रेल्वे फाटकांचा प्रश्न निकाली काढला आहे. ब्रॉडगेज मार्गावर आज एकही मानवरहित रेल्वे क्रॉसींग शिल्लक नाही. यापाठोपाठ रेल्वे कर्मचारी नियुक्त असणारे रेल्वे फाटकसुद्धा पर्यायी व्यवस्था निर्माण करून बंद केले जात आहे. या उपाययोजनेमुळे अपघातांना आळा बसेल. सोबतच रेल्वेवाहतूक गतीमान होण्यासह हातभार लागणार आहे.
देशात गतवर्षी १ हजार ४७७ ठिकाणी उड्डाणपूल किंवा अंडरब्रिज उभारण्यात आले आहे. चालू वर्षात दीड हजार पुलांच्या निर्मितीचे लक्ष्य आहे. त्यातील १९५ पुलांची कामे यापूर्वीच पूर्ण झाली आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत असलेले १९ रेल्वेफाटक गतवर्षापासून वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आले. त्यातील दहा ठिकाणी उड्डाणपूल, अंडरब्रिज किंवा सबवे तयार करण्यात आले आहेत.
दपूमरे नागपूर विभागातील १५ फाटकांसह बिलासपूर विभागातील ३०, रायपूर विभागातील ९ असे एकूण ५४ रेल्वे फाटक चालू वर्षात बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी १७३ कोटींच्या खर्चातून पर्यायी व्यवस्थेची उभारणी केली जाणार आहे. मुंबई मुख्य मार्गावरील सर्व १९३ रेल्वे फाटक पुढील चार वर्षांमध्ये पर्यायी उपाययोजनेसह बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.