नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २६ मार्चदरम्यान घेण्यात येणार आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून कठोर पाऊले उचलण्यात येत आहे.
परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्हा परिषदेत वॉररुम तयार करण्यात आली आहे. राज्यभरात एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. विद्नान शाखेसाठी ७ लाख ६० हजार ४६, कला शाखेसाठी ३ लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखेसाठी ३ लाख २९ हजार ९०५, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३८ हजार २२६, आयटीआयसाठी ४ हजार ७५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
परीक्षेदरम्यान कुठेही गैरप्रकार होत असल्यास त्यासंबंधांत नागरिकांना या वॉररुमकडे तक्रार करता येणार आहे. त्याकरिता नियंत्रण कक्षात ८७९३८१२८०९ हा टोल फ्री व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा टोल फ्री क्रमांक सर्वांपर्यंत पोहोचावा याकरिता शहर आणि ग्रामीण भागातील शाळांना जिल्हा शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत. नागपूर जिल्ह्याकरिता ९ भरारी पथके नेमण्यात आली आहेत.
गैरप्रकार टाळण्यासाठी नियोजन
संवेदनशील परीक्षाकेंद्रांवर व्हिडिओ चित्रीकरण
जास्तीत जास्त परीक्षा केंद्रांना भेटी देण्यात याव्यात.
उपद्रवी केंद्रांना परीक्षा कालावधीत विशेष भेटीचे नियोजन.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर तहसीलदार, गटविकास अधिकारी भेटीसंबंधी नियोजन.
तणावमुक्त वातावरणात परीक्षेसाठी प्रयत्न करावेत.
परीक्षार्थ्यांना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार
विद्यार्थ्यांची झडती केंद्रावर पर्यवेक्षकामार्फत घेण्यात यावी
सर्व परीक्षा केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त वाढवण्यात येणार .