Published On : Wed, Apr 28th, 2021

कोव्हिड रुग्णांसाठी मध्य रेल्वेचे ११ कोच सज्ज

मनपा – मध्य रेल्वे मिळून करणार उपचार महापौर, आयुक्त, डी.आर.एम. यांनी केली पाहणी

नागपूर : नागपूरात कोव्हिड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेचे नागपूर मंडल मदत करायला समोर आले आहे. मध्य रेल्वे कडून अजनीच्या कंटेनर ‍डेपोमध्ये ११ कोचची रॅक तयार करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका आणि मध्य रेल्वे मिळून येथे १७६ बेड्‌सवर कोव्हिड रुग्णांचा उपचार करणार आहे.

बुधवारी (ता. २८ एप्रिल) महापौर श्री. दयाशंकर तिवारी, मध्य रेल्वेच्या नागपूर मंडलचे मंडल रेल प्रबंधक श्रीमती रिचा खरे, मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा, श्री. राम जोशी, अतिरिक्त मंडल रेल प्रबंधक श्री. जय सिंग, मध्य रेल्वेचे अधिकारी सी.एम.एस. श्री. चंपक बिसवास, वरिष्ठ डी.एम.ई. श्री. ‍अखिलेश चौबे, ए.सी.एम.एस श्रीमती वैशाली लोंढेकर, वरिष्ठ डी.ई.एन श्री. रोहित ठवरे, डी.सी.एम. श्री.विपुल सुसकर, मनपा चे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार यांनी कोचेस मध्ये व्यवस्थेची पाहणी केली.

महापौरांनी यावेळी मध्य रेल्वे ला कोव्हिड रुग्णांसाठी त्या ठिकाणी विद्युत व्यवस्था करण्याची सूचना केली. नागपूर महानगरपालिके तर्फे डॉक्टर्स, नर्सेस, ऑक्सीजन, औषधी व जेवणाची ची व्यवस्था करण्यात आली आहे. महापौरांनी सर्व व्यवस्था लवकरात-लवकर पूर्ण करुन रेल्वेच्या कोचेसचा रुग्णांसाठी वापर करण्याची सूचना मनपा प्रशासनाला केली.


मध्य रेल्वेकडून ११ कोचेस ची रुग्णांसाठी व १ कोच ची डॉक्टर व स्टाफसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे तर्फे प्रत्येक कोचला नऊ कूलर व सर्व कोचसाठी २२ ऑक्सीजन सिलेंडर ची व्यवस्था केली आहे. रेल्वे कडून कोचेस तयार करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे.