Published On : Mon, Jan 1st, 2018

कर्जत येथे क्रीडा अकादमीसाठी दहा कोटींचा निधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अहमदनगर: ग्रामीण भागातून चांगले खेळाडू तयार व्हावेत यादृष्टीने कर्जत येथे क्रीडा अकादमी उभारण्याकरीता दहा कोटींचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कर्जत येथे गोदड महाराज क्रीडानगरीत शासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०१७-१८ च्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री प्रा.राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डिले, विनायक मेटे, आर.टी. देशमुख, भिमराव धोंडे, नारायण कुचे, नगराध्यक्ष नामदेव राऊत, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी अभय महाजन, क्रीडा उपसंचालक विजय संतान आदी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले, कबड्डी हा भारताच्या मातीत रुजलेला खेळ असून ती जगाला भारताने दिलेली देणगी आहे. ग्रामीण भागात या खेळाला विशेष प्रतिसाद मिळतो. कर्जत येथील स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद आहे. या प्रतिसादावरुन नागरिकांचे क्रीडाप्रेम दिसून येते. या भागातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी कर्जत येथे क्रीडा अकादमी उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

खेळात जय-पराजय महत्त्वाचा नसून विजयी होण्याची भावना मनात निर्माण होणे आणि त्यादृष्टीने प्रयत्न करणे महत्वाचे आहेत. जीवनात या क्रीडागुणांचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे विजयी संघाएवढेच उपविजयी संघातील खेळाडूदेखील अभिनंदनास पात्र आहेत, असे श्री.फडणवीस म्हणाले.

कुकडी प्रकल्पासाठी तीसरी सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून प्रकल्पासाठी निधी देण्यात येईल, तसेच जागा उपलब्ध झाल्यास कर्जत येथे औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी मंजूरी देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पालकमंत्री प्रा.शिंदे म्हणाले, कर्जतसारख्या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा भरविण्यात आल्याने तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. स्थानिक खेळाडूंना चांगला खेळ पहायला मिळाल्याने त्यांना निश्चितपणे प्रेरणा मिळेल. कर्जत तालुका कुस्ती आणि कबड्डी खेळाचा आणि खेळाडूंचा तालुका आहे. इथल्या खेळाडूंना प्रशिक्षण दिल्यास भविष्यातील ऑलिंपीकपटू येथे घडतील. त्यादृष्टीने कर्जतला क्रीडा अकादमी सुरु करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल प्रा.शिंदे यांनी क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंना धन्यवाद दिले.

जलयुक्त शिवार अभियानामुळे तालुका टँकरमुक्त झाल्याचे सांगून तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कर्जत येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

श्री.विखे-पाटील यांनी कर्जतसारख्या ठिकाणी स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. पालकमंत्र्यांनी स्पर्धेचे उत्तम आयोजन केल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरुष गटातील विजयी ठरलेल्या मुंबई शहर संघाला व महिला गटात पुणे संघाला एक लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश आणि चषक देऊन गौरविण्यात आले. पुरुष गटात ठाणे तर महिला गटात मुंबई उपनगर संघ उपविजयी ठरला. याशिवाय पालकमंत्री प्रा.शिंदे आणि स्थानिक पदाधिकारी यांचेकडून यांनी स्वत: कडून विजयी संघाला एक लाख तर उपविजयी संघाला एक्कावन्न हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

यावेळी मनिषा सोनमाळी यांनी त्यांनी स्वत: काढलेले मुख्यमंत्र्यांचे रेखाचित्र त्यांना भेट दिले. बजरंग कृषी प्रतिष्ठानच्यावतीने मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधीसाठी 51 हजाराचा धनादेश मुख्यमंत्री महोदयांना भेट देण्यात आला.

स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण क्रीडानगरी क्रीडाप्रेमींनी गजबजून गेली होती. मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी याबद्दल कर्जतच्या जनतेचे अभिनंदन केले. यावेळी जिल्ह्यातील जनतेच्या वतीने पालकमंत्री प्रा.शिंदे यांचा सत्कार मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी स्थानिक शिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष तनपुरे व त्यांचे सहकारी, राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी दत्ताभाऊ पाथ्रीकर, बाबूराव चांदेरे, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे आदींनी परिश्रम घेतले.