नागपूर : गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असताना, नागपूर महापालिका आणि पोलिस विभागाने शहरातील गणेश मंडळांना सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी राजवाड्यातील सुरेश भट सभागृहात गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी बैठक घेण्यात आली.
बैठकीत महापालिका आयुक्त अभिजित चौधरी आणि पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सणाच्या काळात सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी प्रदूषण टाळण्यासाठी आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीस सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त शिवाजी राठोड, वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त निकेत कदम, उपायुक्त शशिकांत सातव आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी प्रवीण महिरे उपस्थित होते.
प्रशासनाने मंडळांना विसर्जनाची पूर्वसूचना पोलिसांना देणे, मिरवणुकीदरम्यान डीजेचा आवाज मर्यादित ठेवणे, अश्लील गाणी टाळणे, आवश्यक परवानग्या घेणे आणि जनजागृतीसाठी उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले. गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.