नागपूर : दोन वर्षांत छोटे-मोठे व्यवहार करून विश्वास संपादन केल्यानंतर गोंडखैरीच्या दोन व्यापाऱ्यांनी एमआयडीसीतील एका उद्योजकांकडून ४८ लाखांचा माल उचलला. ही रक्कम न देता आरोपी परप्रांतात पळून गेले. विमलकुमार जैन आणि जितेंद्रकुमार जैन अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे गोंडखैरी (कळमेश्वर) येथील एचव्हीआर प्रोजेक्ट प्रा. लि. चे संचालक आहेत.
फिर्यादी कमलेश जगदीशराय गोयल (रा. वाडी) यांची एमआयडीसीत गणेश अॅण्ड कंपनी नावाने फर्म आहे. दोन वर्षांपूर्वी आरोपी जितेंद्रकुमार आणि विमलकुमार यांच्यासोबत गोयल यांची ओळख झाली. त्यानंतर जैन यांनी गोयल यांना व्हॉटस्अॅपवर मेसेज, कॉल करून सलगी साधली. त्यांच्याकडून माल विकत घेऊन छोटे मोठे व्यवहार करीत आरोपींनी विश्वास संपादन केला.
त्यानंतर २७ सप्टेंबर २०१८ ते १९ मार्च २०१९ या कालावधीत आरोपींनी गोयल यांच्याकडून ४७ लाख ८६ हजार ७६० रुपयांची एमएस प्लेट, राऊंड, विविध उपकरणे तसेच यंत्र विकत घेतले. ठराविक मुदतीत ही रक्कम देण्याचे ठरले असताना आरोपींनी गोयल यांना त्यांच्या मालाची रक्कम न देता पळ काढला. बरेच दिवस पाठपुरावा करूनही आरोपी दाद देत नव्हते. ते कोलकाता येथे पळून गेल्याचे गोयल यांना कळाले.
जैन यांनी विश्वासघात केल्याचे लक्षात आल्याने गोयल यांनी एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सोमवारी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.