Published On : Mon, Dec 5th, 2022

ग्रंथोत्सवाचा शुभारंभ उत्साहात

Advertisement

मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजन व ग्रंथदिडींचे आयोजन

नागपूर: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर ग्रंथोत्सवाचा शुभारंभ शहरातील सेवा सदन शिक्षण संस्था प्रांगणात ग्रंथ पूजनाने करण्यात आला.

त्यानिमित्त ग्रंथदिडीचे आयोजन सेवा सदर शिक्षण संस्था ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील दीक्षांत सभागृहापर्यंत करण्यात आले आहे. ग्रंथ पूजन शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र काटोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, सेवा सदन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. समय बनसोड यावेळी उपस्थित होते.

सेवा सदन शिक्षण संस्था, झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, महाराजबाग चौक मार्गे दीक्षांत सभागृहात ग्रंथदिडीचा समारोप झाला. या रॅलीत सेवा सदन शिक्षण संस्था व मदन गोपाल अग्रवाल विद्यालयाचे 150 विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाले होते. रॅलीत विद्यार्थ्यांनी अनेक महामानवाच्या वेशभूषा साकारुन नागरिकांचे मन आकर्षित केले. त्यासोबत ग्रंथाबद्ल नवीन पिढीस आवड निर्माण होण्याकरीता अनेक बॅनरद्वारे घोषणा देण्यात आल्या. या ग्रंथदिडींत विद्यालयाचे एनसीसी व स्कॉऊटचे विद्यार्थी, ग्रंथ प्रकाशक, शिक्षक, शिक्षीका, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.