Published On : Tue, Jun 30th, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धापेवाडा यात्रा रद्द

Advertisement

नागपूर : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेवून धापेवाडा येथील स्वयंभू श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थानातर्फे आयोजित यात्रेत यावर्षी परिपाठ उत्सवाचे आयोजन करण्यात येऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

श्री क्षेत्र धापेवाडा येथे परिपाठ उत्सवाच्या कालावधीत दिंड्या व पालख्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होऊन भाविकांची गर्दी होते. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रसार व संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. याशिवाय श्रीक्षेत्र धापेवाडा हे स्थळ नागपूर शहर व संसर्ग प्रभावित ग्रामीण क्षेत्रापासून जवळ आहे. हे विचारात घेऊन आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने श्रीक्षेत्र धापेवाडा येथे दिंडी व पालखी घेवून येण्यास, मंदिर तसेच परीसरात व गावामध्ये सवाद्य मिरवणूक काढणे, यात्रा, सामुहिक प्रार्थना, तीर्थवाटप इत्यादींना मनाई करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रसार व प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उद्यापासून म्हणजे 1 जून ते 7 जुलै 2020 पर्यंतच्या कालावधीत मंदिर परीसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच धापेवाडा गावात कोणतेही वाहन व भाविक येणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.