Published On : Tue, Jun 9th, 2020

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत शासकीय कार्यालयात जनतेशी संबंधित कामांना सुरुवात – भूमि अभिलेख कार्यालयात नियमांचे पालन

नागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करताना ‘मिशन बिगिन अगेन’ला सुरुवात झाली आहे. विविध शासकीय कार्यालयामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत शासकीय कार्यालयांमध्ये जनतेशी संबंधित कामांना सुरुवात झाली आहे. भूमी अभिलेख कार्यालयात भूखंडासंदर्भातील संपूर्ण व्यवहार सुरु झाले असल्याची माहिती भूमि अभिलेख विभागाचे नगर भूमापन अधिकारी भूषण मोहिते यांनी दिली.

भूमि अभिलेख कार्यालयात आपल्या मालमत्तेसंबंधी व्यवहाराच्या नोंदी तसेच नोंदी अद्ययावत करणे यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत प्रभागनिहाय दिवस ठरवून दिले आहेत. नागरिकांनी दिलेल्या वेळेत भूमि अभिलेखासंबंधी असलेली कामे पूर्ण करावीत.

सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी मौजा लेंड्रा, पांढराबोडी, अजनी, धंतोली, अंबाझरी, खामला, भामटी, जरीपटका, मानकापूर, दाभा, पोलिसलाईन टाकळी, झिंगाबाई टाकळी व सोमलवाडा या भागासाठी राखीव राहणार आहे.

सोमवार व बुधवार रोजी चिंचभुवन, सोनेगाव, धरमपेठ, फुटाळा व तेलंगखेडी.

मंगळवार व गुरुवार रोजी जयताळा, परसोडी, सीताबर्डी, हजारीपहाड, गाडगा, गोरेवाडा, काचीमाटे, जाटरतोडी, बोरगाव याप्रमाणे संबंधित कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संबंधित विभागाच्या नागरिकांनी ठरवून दिलेल्या दिवशी भूमि अभिलेख कार्यालयात उपस्थित राहावे. शासकीय निर्देशानुसार एक दिवसानंतर 15 कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्रत्येक भागासाठी दिवस निश्चित करण्यात आला आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नक्कल विभाग सुरु असून प्रत्येक नागरिकांना त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. अर्जधारकांना टोकन देण्यात येत असून त्यानंतर साक्षांकित प्रत अर्ध्या तासात देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यालयात प्रवेश केल्यानंतर थर्मल स्क्रिनिंग केल्यानंतर प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानंतर कार्यालयात आल्यानंतर रजिस्टरमध्ये नोंद करुन सॅनिटायझरचा वापर केल्यानंतरच संबंधितांना नियमानुसार कामाची पूर्तता पूर्ण करणार असल्याची माहिती भूमि अभिलेख विभागाचे नगर भूमापन अधिकारी भूषण मोहिते यांनी यावेळी दिली.