Published On : Sun, Jun 7th, 2020

…म्हणून तुकाराम मुंढेंच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

नागपूर : कोरोना प्रादुर्भावाच्या भितीमुळे सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि खासगी कार्यक्रम, सभा-संमेलनाला शासनाने बंदी घातली असताना सुमारे २०० लोकांच्या कार्यक्रमाला हजेरी लावून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध गणेशपेठ पोलिसांकडे एका नागरिकांने तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत सहायक पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरू केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मनीष प्रदीप मेश्राम (रा.सिरसपेठ, नागपूर) असे तक्रारकर्त्याचे नाव असून त्यांनी एका व्हिडीओचा संदर्भ या तक्रारीत दिला आहे. त्यानुसार, आयुक्त तुकाराम मुंढे हे येथील हॉटेल रजवाडा पॅलेसमधील सभागृहात ३१ मे २०२० ला आयोजित कार्यक्रमात २०० लोकांच्या उपस्थितीत मंचावरुन संबोधन करताना दिसून येत असल्याचे म्हटले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या नियमांचे कुठल्याही प्रकारे पालन करण्यात आले नसल्याचे मेश्राम यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

कोरोना महामारीच्या काळात, भारत सरकारने अद्याप कोणत्याही स्वरुपाच्या राजकीय, सामाजिक,धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी प्रदान केली नसताना, मुंढे यांनी या समारंभात उपस्थित राहून सरकारच्या दिशानिर्देशांचा भंग केल्याचे मेश्राम यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मुंढे यांनी असा कार्यक्रम आयोजित करुन २०० लोकांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोपही या तक्रारीत आहे. नागरिकांची गर्दी होऊन महामारीचा प्रादुर्भाव वाढेल,अशी शासन विरोधी कृती करून एका सनदी अधिकाऱ्याने शासनाच्या मार्गदर्शक तत्वाला हरताळ फासला आहे.

अशी शासनविरोधी कृती करुन, अनेकांचा जीव धोक्यात घालत, मुंढे यांनी चुकीचा संदेश पसरवला आहे. ज्या अधिका-यावर नागपूर शहरातील महामारी रोखण्याची जबाबदारी आहे, नागरिकांची कोरोनाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तेच सनदी अधिकारी नियमांचे उल्लंघन करित असेल तर तो गंभीर गुन्हा ठरतो, त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी मेश्राम यांनी तक्रारीतून केली आहे.

तक्रार मिळाली, चौकशी सुरू
यासंबंधाने गणेशपेठ पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी मेश्राम यांची तक्रार मिळाली. सहाय्यक पोलिस आयुक्तांकडून या तक्रारीची चौकशी केली जात असल्याची माहिती दिली.