Published On : Thu, Jun 18th, 2020

पांडे महल खरेदी व्यवहाराची तातडीने चौकशी करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

नागपूर: भंडारा जिल्ह्याची ओळख असलेल्या पांडे महल या ऐतिहासिक वास्तूच्या खरेदी-विक्री व्यवहाराची तपासणी तातडीने करुन पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्याच्या तहसीलदारांना दिल्या. खरेदी-विक्री व्यवहार चुकीचा झाला असल्यास रद्द करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

पांडे महलच्या संरक्षण, संवर्धन व सौंदर्यीकरण कार्याला गती प्रदान करण्याबाबत आज मुख्यमंत्री सचिवालय नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार भंडारा अक्षय पोयाम, नगरपालिका मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, नगरपालिका प्रशासन अधिकारी सुधीर गवळी, पुरातत्व विभागाचे शांताराम केकडे, बहुमूल्य वास्तू संवर्धन व संरक्षण विकास समितीचे सदस्य विजय खंडेरा, डॉ. नितीन तुरसकर, ॲङ सुशील वंजारी, शितल तिवारी, विकास मदनकर, अजय मेश्राम, प्रतीक तांबोळी, वास्तुविशारद निकीता रामानी, डॉ. मधुरा राठोड व रविनाथ यावेळी उपस्थित होते.

ऐतिहासिक वास्तूचे महत्त्व लक्षात घेता पांडे महालाच्या खरेदी-विक्री व्यवहारात चुकीच्या पध्दतीचा वापर करण्यात आला. तसेच अवैध कागदपत्रे सादर करण्यात आली, असा आक्षेप समितीने यावेळी नोंदविला. यावर तहसीलदारांनी या व्यवहाराची पंधरा दिवसात चौकशी करावी, अशी सूचना श्री. पटोले यांनी केली. या व्यवहारात चूक आढळल्यास तो व्यवहार रद्द करावा, असे ते म्हणाले. पांडे महल खरेदी व्यवहारात चुकीच्या पत्रव्यवहाराचा वापर झाल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला. यावर बोलताना श्री. पटोले म्हणाले की, नगरपालिकेने या पत्रव्यवहाराची तातडीने चौकशी करावी.


पांडे महल सौंदर्यीकरणाचा आराखडा तातडीने तयार करण्याच्या सूचना श्री. पटोले यांनी पुरातत्व विभागाला दिल्या. पुरातत्व विभागाने नोटीफिकेशन काढून या कामाला गती द्यावी असे ते म्हणाले. यासाठी वास्तुविशारद नेमावा असे त्यांनी सांगितले. पुरातत्व विभागाने भंडारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू व गडकिल्ल्यांचा आढावा घेवून विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पासाठी

निधी उपलब्ध करुन दिला जाईल

धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-2 प्रकल्पासाठी लागणारा 85 कोटींचा निधी त्वरित उपलब्ध करुन देण्यात येईल. या प्रकल्पाचे काम तातडीने सुरु करावे अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जलसंपदा विभागाला दिल्या. साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यातील सिंचन प्रकल्पाचा आढावा येथील मुख्यमंत्री सचिवालयात येथे घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

गोसेखुर्द उपसा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता ज. द. टाले, गोसेखुर्द प्रकल्प मंडळ नागपूरचे अधीक्षक अभियंता अंकुश देसाई, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत बोरकर, धापेवाडा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पृथ्वीराज फाळके, नेरला उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल फरकडे, डावा कालवा विभाग कार्यकारी अभियंता सुहास मोरे व पाटपबंधारे प्रकल्प अन्वेषण विभागाच्या कार्यकारी अभियंता अनिता पराते यावेळी उपस्थित होते.

धापेवाडा उपसा सिंचन योजना
धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-2 प्रकल्पासाठी 85 कोटी रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करुन देण्यात येईल. इतका निधी उपलब्ध झाल्यानंतर पाईपलाईन्सची कामे पूर्ण होऊन बोदलकसा व चोरकमारा तलावांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना अध्यक्षांनी केल्या. तसेच पुढील कामांसाठी 35 हेक्टर वन जमिनीची आवश्यकता असल्यामुळे वन प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

गोसीखुर्द डावा कालवा
गोसीखुर्द डावा कालव्यांतर्गत पवनी व लाखांदूर तालुक्यातील उर्वरित सुमारे 8000 हेक्टर सिंचनक्षमता निर्माण करण्यासाठी नवीन निविदा काढणे आवश्यक असल्याने त्यासाठी पुढील आठवड्यामध्ये मंत्रालय, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. तसेच गोसीखुर्द धरणाच्या पायथ्यालगत असणाऱ्या कुर्झा, वासेळा गावांना लवकरात लवकर सिंचन सुविधा देण्यासाठी गोसी उपसा सचिंन योजनेचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

नेरला उपसा सिंचन योजना
नेरला उपसा सिंचन योजनेची सिंचनक्षमता 23 हजार 447 असून सद्य:स्थितीत 10 हजार 612 हेक्टर सिंचनक्षमता निर्मित झाली आहे. उर्वरित सिंचन क्षमता निर्माण करण्याकरिता बंद नलिका वितरण प्रणालीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अध्यक्षांनी केल्या.

धारगाव उपसा सिंचन योजना
प्रस्तावित धारगाव उपसा सिंचन योजना टप्पा-1 व टप्पा-2 अंतर्गत भंडारा तालुक्यातील 31 लाखनी-19 व साकोली-21 अशा 71 गावांतील 11 हजार 700 हेक्टर क्षत्रात सिंचनाचा लाभ मिळणार आहे. टप्पा-1 अंतर्गत सर्वेक्षण झाले असून सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरच तयार करण्यात येईल. तर टप्पा-2 चे सविस्तर प्रकल्प अहवालाकरिता सर्वेक्षण व इतर कार्यवाही त्वरित सुरु करण्याचे निर्देश श्री. पटोले यांनी दिले.

भंडारा येथील आश्रमशाळेच्या गैरव्यवहाराबाबत चौकशी करून

योग्य प्रशासक नियुक्त करा
आदिवासी गोवारी समाज संघटनेतर्फे चालविण्यात येणाऱ्या भंडारा येथील विशेष मागास प्रवर्ग आश्रमशाळेतील गैरव्यवहाराबाबत तात्काळ चौकशी करून धर्मदाय आयुक्तांनी तेथे प्रशासक नियुक्त करावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिले.

येथील मुख्यमंत्री सचिवालयाच्या समिती कक्षात विशेष मागास प्रवर्ग आश्रमशाळेच्या गैरव्यवहाराबाबत श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. धर्मदाय सहआयुक्त आभा कोल्हे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, धर्मदाय सहायक माणिक सातव, भंडारा समाज कल्याण सहायक आयुक्त आशा कवाडे, गोंदिया सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, तक्रारदार वा.ल. नेवारे तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

विशेष मागास प्रवर्ग आश्रमशाळेच्या कार्यकारी समितीबाबत धर्मदाय आयुक्तांनी खरी कार्यकारिणी कोणती आहे, याबाबत खात्री करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा. या संस्थेचे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यामुळे लवकर निपटारा केल्यास त्या संस्थेचे वैधानिक कार्यकारी मंडळ कोणते, हे निश्चित होईल. तसेच सामाजिक न्याय विभागाने श्री. नेवारे यांच्या तक्रारीची खातरजमा करावी. दोषी आढळल्यास नवीन प्रशासक बसवावा, अशा सूचना श्री. पटोले यांनी यावेळी दिल्या.