Published On : Wed, Jul 15th, 2020

नागपूर जिल्ह्यात वाढलेल्या रुग्णांचे ओझे शहरावर का?

नागपूर : कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि वस्त्यांबाबत शहरवासीयांना विशेष उत्सुकता आहे. त्यांच्या परिसरात तर कुणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही ना याची माहिती त्यांना जाणून घ्यायची असते. मंगळवारी सोशल मीडियावर दुपारी १४८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा आकडा फिरत होता. त्यामुळे शहरवासीय चिंतेत पडले. अखेर इतके रुग्ण कसे काय वाढले. हे रुग्ण कोणत्या परिसरातील आहे, ही आकडेवारी खरी आहे काय,असे प्रश्न त्यांना पडले. जिल्हा प्रशासनाने विविध प्रयोगशाळेत तपासलेल्या नमुन्यांच्या आधारावर ही माहिती जारी केली. परंतु परिसराचा उल्लेख केला नव्हता. केवळ नागपूर जिल्हा असे लिहिले होते. दुसरीकडे मनपातर्फे दररोज फेसबुक,ट्विटर, वेबसाईटच्या माध्यमातून आकडेवारी जारी केली जाते. त्यांनी सायंकाळी ५ वाजता शहरात केवळ ४२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याचे सांगितले होते. जिल्हा प्रशासन आणि मनपाच्या आकडेवारीत शहरवासीय अडकून पडले.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केले होते की, नागरिक सुधारले नाही तर पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येईल. या वक्तव्यानंतर नागपुरात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याचे मॅसेज सोशल मीडियावर खूप फिरू लागले. या मॅसेजमध्ये कधी १४ जुलैपासून तर कधी १६ जुलैपासून लॉकडाऊन लागणार असल्याचा उल्लेख करण्यात येत होता. परंतु या फेक मॅसेजबाबत ना जिल्हा प्रशासन ना मनपा प्रशासनाने काही वक्तव्य जारी केले. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पुन्हा लॉकडाऊन नको आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, जिल्ह्यात जर रुग्णांची संख्या वाढत असेल तर शहरात लॉकडाऊन लावण्याचा इशारा देणे कुठपर्यंत योग्य आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनबाबत असे कुठल्याही प्रकारचे संकेत जिल्हा प्रशासनाने जारी केलेले नाहीत. शहरवासी चिंतेत आहे. दुविधेत अडकले आहेत. सर्वप्रथम नागपूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांचे खरे आकडे आणि परिसराची माहिती देण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.

मंगळवारी जिल्हा प्रशासनाने नागपूर जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत १४८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याची घोषणा केली. यात एम्सच्या प्रयोगशाळेत ६८, नीरीच्या प्रयोगशाळेत १८, माफसूच्या प्रयोगशाळेत १६, मेयोच्या १३, मेडिकलच्या ७, खासगी प्रयोगशाळेत ९, अ‍ॅण्टीजन टेस्टमध्ये ६ आणि इतर प्रयोगशाळेत ११ नमुने पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती देण्यात आली. परंतु हे रुग्ण नेमके कोणत्या परिसरातील किंवा तालुक्यातील आहेत, याचा उल्लेख केला नाही.


दुसरीकडे मनपाने जारी केलेल्या माहितीमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरात ४६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याचे सांगितले. रात्री ९ वाजेपर्यंत हा आकडा ६० पर्यंत पोहोचला. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाच्या आकडेवारीतील सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंतर पाहिले तर एकूण १०२ रुग्ण ग्रामीण भागातील होतात. परंतु जिल्ह्यात कामठी (२६ रुग्ण) वगळले तर उर्वरित रुग्णांचे नमुने कोणत्या तालुक्यातील आहेत, हा प्रश्न उपस्थित होतो. मंगळवारी २०११ नमुने तपासण्यात आले. दुसरीकडे मे-जून महिन्यात ३०० ते ४०० रुग्णांची तपासणी केली जात होती.