Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jul 23rd, 2020

  नागपुरात अर्ध्या तासात पती-पत्नीचा कोरोनाने मृत्यू

  नागपूर : कोरोनामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. केवळ अर्ध्या तासात पती व पत्नीचा मृत्यू झाला आहे. मुलगासुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. रेशीमबाग येथील पुष्पांजली अपार्टमेंट येथे हे कुटुंब राहते. एकाच घरात दोघांचा मृत्यू व तिसरा पॉझिटिव्ह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पतीचे वय ६६ तर पत्नी ६० वर्षाची होती. यापूर्वी मनीषनगरात पिता-पुत्राचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

  प्रभागाचे नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांनी सांगितले की, मृताचे इतवारी येथील धारस्कर रोडवर फुटवेअरचे दुकान होते. त्यांना काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे जगनाडे चौकातील एका खासगी रुग्णालयात सोमवारी सकाळी त्यांना उपचारासाठी भरती केले होते. रुग्णालयात त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. सोमवारी रात्री त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

  सोमवारी रात्री १०.३० वाजता त्यांच्या ३९ वर्षीय मुलाचा फोन आला की, आईचीसुद्धा प्रकृती अत्यवस्थ आहे.

  याचदरम्यान खासगी रुग्णालयात भरती असलेल्या त्यांच्या वडिलांना शिफ्ट करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स मागविण्यात आली होती. परंतु अ‍ॅम्ब्युलन्स वेळेत पोहचली नाही. सोमवारी रात्री १२ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अर्ध्या तासात घरी आजारी असलेल्या त्यांच्या आईचासुद्धा मृत्यू झाला. अवघ्या अर्धा तासात आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने मुलाला चांगलाच धक्का बसला. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याला मेडिकलमध्ये भरती करण्यात आले आहे. पती-पत्नीचे अंत्यसंस्कार मनपा कर्मचाऱ्यांच्या मदतीने केले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145