मौदा:शेजारील वादातून निर्माण झालेल्या आगीत एका कुटुंबाचे सुमारे १४ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना मौदा येथे शनिवारी सकाळी घडली. या आगीत एक चारचाकी आणि दोन दुचाकी जळून भस्मसात झाल्या.
लक्ष्मीनगर परिसरात राहणारे नितेश तडेकार आणि त्यांचे कुटुंबीय ‘राजेंद्र ट्रेडर्स अॅण्ड हार्डवेअर’ नावाचे दुकान चालवतात. त्यांच्या दुकानासमोरील नगर पंचायतच्या मोकळ्या जागेत ते आपले काही साहित्य आणि वाहने ठेवत असतात. मात्र याच मुद्द्यावरून त्यांचा शेजारी राजू सोनकुसरे यांच्याशी गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.
१६ मेच्या रात्री नितेश तडेकार झोपले असताना, पहाटे त्यांचा भाऊ सचिन याने आग लागल्याची सूचना दिली. नितेश यांनी तातडीने धाव घेतली असता, त्यांची कार (एमएच ४० सीएच २२६७) आणि दोन दुचाकी (एमएच ३१ एक्यू ६५९५ व एमएच ४९ एए २४२८) पेटून खाक झालेल्या आढळल्या.
प्राथमिक तपासात एचडीपीई पाईपच्या बंडलला आग लागल्यामुळे ही घटना घडल्याचे समोर आले आहे. ही आग हेतुपुरस्सर लावण्यात आल्याचा संशय असून, या प्रकरणी नितेश तडेकार यांच्या तक्रारीवरून मौदा पोलिसांनी राजू सोनकुसरे याच्याविरुद्ध कलम ३२४ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सारीन एकनाथ दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मंगेश डांगे करीत आहेत.