Published On : Wed, Mar 18th, 2020

घाबरु नका, सहकार्य करा, सगळे मिळून कोरोनाला हद्दपार करु!

महापौर संदीप जोशी : केलेली कार्यवाही आणि उपाययोजनांचा घेतला आढावा

नागपूर : जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात आज तिसऱ्या आठवड्यात कोरोना संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या तुलनेने फार कमी आहे. केंद्र आणि राज्य शासन तसेच स्थानिक यंत्रणांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाय केले म्हणून ‘कोरोना’वर बऱ्याच अंशी नियंत्रणात आहे. मात्र, पुढील काही आठवडे काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक यंत्रणेने आदेश काढलेले आहेत. तरीही यामध्ये लोकांचे सहकार्य गरजेचे आहे. गर्दी करु नका, अफवा पसरवू नका आणि काळजी घ्या, असे आवाहन करीत तसे नाही केले तर जनहितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी केले.

‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी स्थानिक यंत्रणेतर्फे आजवर केलेल्या कार्यवाहीची आणि करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बुधवारी (ता. १८) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, नगरसेवक निशांत गांधी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, राजेश मोहिते, आरोग्य उपसंचालक तथा आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, वैद्यकीय अधिकारी नरेंद्र बहिरवार, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, डॉ. अविनाश गावंडे, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला, सचिव डॉ. मंजुषा गिरी, आयएमएच्या डॉ. अर्चना कोठारी, एन.डी.सी.डी.ए.चे उपाध्यक्ष वीरभान केवलरामानी, सहसचिव धनंजय जोशी, श्रीकांत मुंडे आदी उपस्थित होते.

यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांनी ‘कोरोना’संदर्भात नागपूरशी संबंधित माहिती दिली. नागपुरात चार रुग्ण कोरोना बाधीत असल्याचे आढळले. त्यांच्याशी संपर्कात आलेल्या ८३ जणांवर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे. राज्यात मुंबई, पुणे आणि नागपुरातील मेयो रुग्णालयात चाचणीची व्यवस्था आहे. परदेशातून येणाऱ्यांसाठी आमदार निवास येथे २४० खाटांची व्यवस्था असून त्यांना टूथब्रश, जेवण, वर्तमानपत्रापासून सर्व सोयी पुरविण्यात येत आहे. तेथील कर्मचाऱ्यांनाही पूर्ण साहित्य पुरविण्यात आले आहे. ज्यांची-ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशांना या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनीही नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून सर्वच खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आता तिसरा आठवडा सुरू झाला आहे. नागरिकांनी आता अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. वेळ पडली तर अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश काढण्यात येतील, असेही ते म्हणाले.

महापौर संदीप जोशी म्हणाले, कोरोनाचा वापर करून अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या सर्व लोकांवर कारवाई करण्यात येईल. मेडिकल असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत प्रसिद्धी करून ज्या मेडिकल स्टोअर्समधून मास्क, सॅनिटायझरसारख्या वस्तूंचा काळाबाजार होत असेल त्यांची माहिती नागरिकांकडूनच मागवावी. अशा दुकानदारांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश दिले. लग्न समारंभ किंवा अन्य सार्वजनिक कार्यक्रम तातडीने रद्द करावे. सभागृह मालकांनीही यात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. सर्वांनी एकत्रित येऊन कोरोनाला लढा देऊ, असेही ते म्हणाले.

मनपाचा नियंत्रण कक्ष २४ बाय ७

कोरोनासंदर्भातील माहिती अथवा संशयिताबद्दलची माहिती देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने नियंत्रण कक्ष स्थापित केला आहे. दूरध्वनी क्रमांक ०७१२-२२५६७०२१ असून नागरिकांनी कोरोना बाधितासंदर्भात कुठलीही माहिती नियंत्रण कक्षाला द्यावी अथवा करावयाच्या उपाययोजनासंदर्भात माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आय.एम.ए.ने सुद्धा जनतेला ‘कोरोना’च्या संदर्भातील माहिती देण्यासाठी २४ बाय ७ हेल्पलाईन सुरू केली आहे. यावरून सरळ डॉक्टरांशी संवाद साधता येतो. नागरिकांनी आय.एम.ए.च्या भ्रमणध्वनी क्रमांक ९९९९६७२२३८ आणि ९९९९६७२२३९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आय.एम.ए.च्या वतीने करण्यात आले आहे.

वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट लावा

नागरिकांनी भयभीत होऊन मास्कचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू केला आहे. मात्र, मास्कचा वापर केल्याने संसर्ग होण्याची भीती अधिक आहे. कारण मास्क लावल्यानंतर वेळोवळी तळहाताचा संपर्क तोंड, नाकाशी येतो. शिवाय वापरलेले मास्क ठिकठिकाणी पडलेले आढळत आहेत. यामुळे संसर्गाचा धोका अधिक संभवतो. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो मास्क वापरू नये. वापरले तर ते योग्य प्रकारे कागदात गुंडाळून मनपाच्या स्वच्छतादूताकडे अर्थात कचरा गाड्यांमध्ये द्यावे. त्यात स्वतंत्रपणे ते ठेवण्यात येईल व योग्य विल्हेवाट लावली जाईल, असे आवाहनही महापौर संदीप जोशी यांनी केले.