Published On : Mon, Mar 27th, 2017

कौशल्य विकास कार्यक्रमाचा युवकांनी उपयोग करुन घ्यावा

नागपूर: देशातील सर्व बेरोजगारांना इ. स. 2022 पर्यंत उपजीविकेचे साधन मिळवून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम महत्त्वाचा आहे. युवकांनी त्याचा उपयोग करून विविध कौशल्ये आत्मसात करावीत आणि विपरीत परिस्थितीवर मात करत आयुष्यात स्थिर व्हावे असे आवाहन राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात फॉर्च्यून फाऊंडेशन, इंजीनिअरिंग कॉलेजेस प्लेसमेंट असोसिएशन व नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने युथ एम्पॉवरमेंट समिट, या तीन दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्याचे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी संभाजी पाटील निलंगेकर बोलत होते

व्यासपीठावर महापौर श्रीमती नंदा जिचकार, उपमहापौर दिपराज पार्डीकर, फॉर्च्यून फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, कौशल्य विकास विभागाचे सहसचिव सुनील भारद्वाज, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालयाचे आयुक्त विजय वाघमारे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समितीचे सभापती संदिप जाधव, डीएसके ग्रुपचे डी. एस. कुळकर्णी, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या सदस्या श्रीमती राणी द्विवेदी, माजी महापौर प्रवीण दटके उपस्थित होते.


यावेळी कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत फॉर्च्यून फाऊंडेशने नामांकित कंपनी इप्टाबेस व व्ही ग्लोकल कंपनीशी विदर्भातील 2 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

संभाजी पाटील निलंगेकर पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील युवकांच्या हाताला काम मिळावे. यासाठी विदर्भात मोठ्या प्रमाणात उद्योग आणत असून त्या उद्योगाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहेत. त्या संधीचे युवकांनी सोने करावे.

ते पुढे म्हणाले की, ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’ हा कार्यक्रम केवळ नागपूर पुरता मर्यादित न राहता तो राज्यशासनाचा कार्यक्रम व्हावा . यासाठी राज्यात महानगरपालिका व जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येणार असल्याचेही संभाजी पाटील निलंगेकर सांगितले.

महापौर नंदा जिचकार

युवकांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असताना त्या संधीचा फायदा घेणे आवश्यक असल्याचे सांगून महापौर श्रीमती नंदा जिचकार म्हणाल्या की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया स्टॅण्ड अप इंडिया असा संदेश देवून रोजगाराच्या वाटा मोकळ्या केल्या. आजच्या शिक्षण पद्धतीत दोष असल्याने शिक्षित असून देखील रोजगाराची संधी प्राप्त होत नाही. जीवनात ध्येय निश्चित करण्यासाठी स्वत:मधील सूप्त गुणांना ओळखा. कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना दिशा मिळाली असून, तरूणांनी त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घ्यावा.

युवकांनी आवडीचे क्षेत्र निवडावे. पदवीचे ओझे झुगारून पुढे जाण्याची जिद्द युवकांनी आत्मसात करावी, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.

कौशल्य विकास विभागाचे सहसचिव सुनील भारद्वाज
केंद्र शासनाने युवकांसाठी सुरु केलेला कौशल्य विकास कार्यक्रम युवकांना प्रेरीत करीत असून त्यामुळे युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.

आजच्या युवकांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावी, याकरिता राज्य व केंद्र शासनाकडे सतत पाठपुरावा करत आहे. त्याकरिता केंद्र शासनाने युवकांना रोजगार व उद्योगाविषयी माहिती देण्याकरिता ॲप तयार केले आहे. या ॲपवर सर्व प्रकारच्या रोजगाराची माहिती युवकांना मिळणार असून युवकांनी त्याचा फायदा घ्यावा. असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहसचिव सुनील भारद्वाज यांनी केले.

आयुक्त श्रावण हर्डीकर

संपूर्ण देशात कौशल्य विकास कार्यक्रम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात राबविला जात आहे. प्रत्येक युवकांपर्यंत पोहचण्याकरिता स्वतंत्र प्रणाली तयार करावी. या उद्देशाने फॉर्च्यून फाऊंडेशनशी जोडून नागपूर महानगरपालिकेने खारीचा वाटा उचलला आहे. कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यातून प्रत्येक युवकांपर्यंत पोहचण्याचा उद्देश असल्याचे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

युवकांना नामांकित कंपनी, विविध संस्थेत रोजगाराची संधी उपलब्ध असताना आजच्या युवक त्याकडे वळत नाही. एखाद्या कंपनीत लठ्ठपगाराची नोकरी करावी. असा त्यांचा उद्देश असतो. परंतु भविष्यात करिअर बनवायचे असेल तर, आपल्यातील कौशल्याचा विकास करावा. ज्या क्षेत्रात करिअर बनवाल त्या क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करा. असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना फॉर्च्यून फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार प्रा. अनिल सोले म्हणाले की, इ.स. 2020 पर्यंत भारत जगामध्ये युवकांचा देश म्हणून ओळखला जाणार आहे. देशाच खरे नेतृत्व आजचा युवक करू शकतो. कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मेळाव्यातून 5 हजार विद्यार्थ्यांना विविध कंपन्या व संस्थेच्या माध्यमातून रोजगार देण्याचा उद्देश आहे. तसेच स्वयंरोजगाला प्रोत्साहन देण्याकरिता मुद्राबँक कर्ज योजना सुरू करण्यात आली असून, याबाबत माहिती देण्याकरिता 22 बॅकांनी मेळाव्यात सहभाग घेतला असल्याचे सांगितले. संचालन श्रीमती रेणुका देशकर यांनी तर आभार स्थायी समिती सभापती यांनी मानले. कार्यक्रमाला युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.