Published On : Wed, Apr 5th, 2017

उत्तरप्रदेशात कर्जमाफी तर महाराष्ट्रावरच अन्याय का?

Mumbai: महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांची परिस्थिती उत्तर प्रदेशपेक्षा गंभीर असताना भारतीय जनता पक्षाचे सरकार येथील शेतक-यांना कर्जमाफी देत नाही, परंतु उत्तर प्रदेशात कर्जमाफी केली जाते, हा महाराष्ट्रातील शेतक-यांवर अन्याय असल्याची संतप्त प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

उत्तर प्रदेशातील कर्जमाफीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी भाजपा-शिवसेना सरकारच्या दुटप्पीपणाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, मागील अडीच वर्षात नऊ हजार शेतक-यांच्या आत्महत्यांचा दुर्दैवी उच्चांक झाला आहे. राज्यातील शेतकरी सरकारच्या नावे पत्र लिहून आत्महत्या करत आहेत, असंख्य शेतक-यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये सरकारने कर्जमाफी करावी, अशी अंतिम इच्छा व्यक्त केलेली आहे. तरिही हे सरकार शेतकरी कर्जमाफी करत नाही.

भाजपचे केंद्र सरकार महाराष्ट्राच्या कर्जमाफीसाठी मदत करण्याची ठोस भूमिका घेत नाही. या परिस्थितीत उत्तर प्रदेशातील शेतक-यांना जाहीर झालेली कर्जमाफी म्हणजे महाराष्ट्रातील शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे असून या दुजाभावाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.