Published On : Tue, May 19th, 2020

नागपूर शहरात २२ मे पर्यंत जुनेच आदेश लागू

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती

नागपूर: महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाउनमध्ये शिथिलता संबंधिचे नवीन आदेश मंगळवारी (ता.१९) निर्गमीत करण्यात आले आहेत. हे आदेश राज्यात २२ मे पासून अंमलात येणार आहेत. त्यामुळे सद्यातरी नागपूर रेड झोनमध्ये आहे. मागील चार ते पाच दिवसात शहरात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात अजूनही अनेक ‘हॉटस्पॉट’ आहेत. राज्य शासनाने १९ मे रोजी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये रेड झोनमधून नागपूरचे नाव वगळले असले तरी शहरातील स्थिती पाहता अजुनही कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करणे व उचित दक्षता घेणे आवश्यक आहे. सद्यातरी नागपूर शहरामध्ये लागू असलेल्या मनपाच्या १७ मे रोजीच्या आदेशात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. त्यामुळे २२ मे पर्यंत नागपूर शहरात जुनेच आदेश लागू राहणार आहेत, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यासंबंधी माहिती देताना त्यांनी सांगितले की, लॉकडाउन संबंधी महानगरपालिकेचे १७ मे आणि त्यापूर्वी काढलेले आदेश सद्या अस्तित्वात आहेत. नवीन आदेश २२ मे रोजी शहरातील परिस्थिती पाहून निर्गमीत करण्यात येईल. नागपूर शहराला कायमस्वरूपी रेड झोनमधून बाहेर काढण्यासाठी सद्या आहे त्या आदेशाचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. १७ मे रोजी देण्यात आलेलेच आदेश लागू असून कुणीही या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, प्रशासनीक कायदा आणि भारतीय दंड विधान कायद्यानुसार कारवाई केली जाईल. त्यामुळे परवानगी दिलेल्या बाबींव्यतिरिक्त कुणीही घराबाहेर पडू नये.

यापूर्वी १७ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिकेने घरपोच मद्यविक्री, नागरी क्षेत्रातील बांधकाम जेथे कामगार निवासी राहतील, तेथे बांधकाम सुरू करता येईल. आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन, इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल, संगणक, मोबाईल, होम अम्प्लायन्सेस दुरूस्ती, (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार), ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार), ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार) अशाप्रकारे सुरू राहतील. ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण), खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत, सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत सुरू करता येतील. याव्यतिरिक्त, मान्सूनपूर्व सर्व कामे सुरू करता येतील. प्रतिबंधित क्षेत्रात हा आदेश लागू राहणार नाही. केवळ तेथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत सुरू असतील. प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे ती प्रतिष्ठाने सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरु राहतील. जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, नागरी क्षेत्रातील उद्योग, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी राहणार नाही.

Advertisement
Advertisement