Published On : Mon, Apr 13th, 2020

अग्निशमन विभाग पाळणार १४ पासून अग्निशमन सेवा सप्ताह

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातून करणार जनजागृती


नागपूर : अग्निशमन विभागात कार्यरत असताना आणि कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करणाऱ्या जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिवस तर १४ ते २० एप्रिल हा अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्यामुळे नागपूर महानगरपालिका अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागातर्फे कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम न करता केवळ महापौर संदीप जोशी यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून मंगळवारी (ता. १४) सकाळी १०.३० वाजता मनपाच्या सिव्हील लाईन मुख्यालयात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येईल. यासोबतच अग्निशमन सेवा सप्ताहाच्या काळात अग्निसुरक्षेसंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

लंडनहून कराचीमार्गे १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईत गोदीत दाखल झालेल्या ‘एस.एस. फोर्ट स्टिकिंग’ या जहाजाचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीशी झुंज देताना अग्निशमन दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या दिवसाचे स्मरण म्हणून संपूर्ण भारतात अग्निशमन सेवेतील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. आगीच्या धोक्यासंदर्भात जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने १४ ते २० एप्रिल या कालावधीत संपूर्ण देशात अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येतो.

त्याच अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागातील हौतात्म्य पत्करलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. नागपूर महानगरपालिका अग्निशमन विभागातील स्थानाधिकारी गुलाबराव कावळे, फायरमन प्रभू कुहीकर, रमेश ठाकरे हे कर्तव्यावर असताना शहीद झालेत. या तिघांनाही यावेळी अभिवादन करण्यात येईल.

सन २०१९-२० मधील आगीच्या घटना १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीतील शहरात एकूण १०४४ आगी लागल्या. यामध्ये ७१० लहान, १४० मध्यम आणि १९४ मोठ्या आगींचा समावेश आहे. यामध्ये ९१ कोटी ६७ लाख ७१ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले तर ९८ कोटी ५४ लाख ७२ हजार ५४० रुपयांची मालमत्ता वाचविण्यात आली. आगींच्या घटनाव्यतिरिक्त इतर एकूण ७३७ आपातकालीन घटनांची सूचना विभागाला प्राप्त झाली होती. त्यामध्ये विहीर व तलावांच्या घटनांचा समावेश होता. १४९ प्रकरणात १७ जण जखमी झाले तर ६७ जणांना मृतावस्थेत बाहेर काढण्यात आले. विभागाचे मूळ कार्य नसतानादेखिल ३१९० दूषित विहिरींचा उपसा करण्यात आला. त्यामध्ये मनपा झोनअंतर्गत प्राप्त अर्जानुसार विहिरींचा उपसा करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यास हातभार विभागाने लावला.

अग्निशमन विभागाने नागपूर शहराच्या हद्दीबाहेर ९९ घटनांमध्ये सेवा दिली आहे. या आगींमध्ये ३० कोटी ४३ लाख ८९ हजार ९०० रुपयांची हानी झाली तर ५० कोटी ४० लाख १६ हजार ५०० रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले.

उत्पन्न आणि कार्यवाही
मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे इमारत तथा व्यवसायाकरिता नाहरकत प्रमाणपत्राद्वारे, अग्निशमन सेवा शुल्क, निरीक्षण शुल्क, पाणी पुरवठा, विहीर उपसा तसेच मनपा हद्दीबाहरे पुरविण्यात आलेल्या अग्निशमन सेवेच्या माध्यमातून तीन कोटी सहा लाख ७९ हजार २९७ उत्पन्न प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियमांतगरत अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागातर्फे उपाययोजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या इमारतधारक / भोगवटदारांविरुद्ध ६२८ इमारतधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. ५२२ इमारतधारकांना इमारतीमधून दूर निघून जाण्यास नोटीस देण्यात आले. ३३३ इमारतींचा पाणी व विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला तर ४९ इमारत धारकाने कोणतीही अग्निशमन उपाययोजना उभारण्यासंबंधी दखल न घेतल्याने त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यास पोलिस विभागाला पत्र देण्यात आलेले आहे. या कार्यवाहीअंतर्गत ज्या इमारतधारकाने अग्निशमन उपाययोजना उभारण्याचे कार्य सुरु केले अशा ९१ इमारतींचा पाणी व विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

जनजागृती आणि मॉकड्रील
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे अग्निसुरक्षा अभियानांतर्गत वर्षभरात एकूण ११० उपक्रम राबविण्यात आले. शाळा, कॉलेज, रुग्णालय इमारती, शासकीय व निमशासकीय इमारती, बँक, हिंदुस्थान पेट्रोलियम, लॉयन्स क्लब, हॉस्पीटल्स, क्लब, थिएटर, न्यायालय, मेट्रो रेल्वे, जीपीओ, हॉटेल्स इमारती आदी ठिकाणी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये सुमारे १४४३० नागरिक सहभागी झाले होते. मॉकड्रीलच्या माध्यमातून आगीसंदर्भात सतर्कता पाळण्यास सांगण्यात आले.

भविष्यातील नियोजन
भविष्यात अग्निशमन सेवा अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी अग्निरोधक फायरसूट खरेदी करण्यात येणार आहे. अरुंद रस्त्यातील वस्त्या, गर्दीच्या बाजारपेठ, स्लम एरिया या भागातील आगीच्या दुर्घटनावर कार्य करण्यास ३२ मीटर हायड्रॉलिक प्लॅटफार्म खरेदीची निविदा स्थायी समितीच्या मान्यतेकरिता सादर करण्यात आले आहे. आरक्षित जागेवर अग्निशमन केंद्राचे निर्माण कार्य सुरू होणार आहे. कळमना अग्निशमन केंद्रातील अतिरिक्त जागेवर जलतरण केंद्राचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. अग्निशमन विभागात गंजीपेठ, सिव्हील, लकडगंज, पाचपावली, कॉटन मार्केट अशी पाच स्थानक होती. त्यानंतर सक्करदरा, कळमना, नरेंद्रनगर, सुगतनगर आणि मागील वर्षी त्रिमूर्ती अग्निशामक स्थानक सुरू झाले आहे,