Published On : Tue, Nov 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा; 5 हजारांच्या मदतीवरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

Advertisement

दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा; 5 हजारांच्या मदतीवरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या 5 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. श्रीमंत जीवनशैली जगणाऱ्या लोकांना 5 हजार रुपयांची किंमत कळणार नाही, मात्र संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत महत्त्वाची आहे, असं त्यांनी म्हटलं.

पुण्यात हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध विकासकामांसह शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका पुणेकरांसाठी मोठी सुविधा ठरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या मार्गावर यापूर्वी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. नव्या मेट्रोमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून वेळेचीही बचत होईल. 23 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर एकूण 23 स्थानकं उभारण्यात आली आहेत.

या प्रकल्पाच्या कामात अनेक अडचणी आल्या, मात्र त्या दूर करून मेट्रो सेवा सुरू करण्यात यश मिळालं. या मार्गिकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठा सहभाग. लोकोपायलटपासून ते महत्त्वाच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय जबाबदाऱ्यांपर्यंत महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Advertisement

पुणे मेट्रोचं जाळं 120 किलोमीटरपर्यंत विस्तारण्याची योजना-
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. आगामी काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह पीएमआरडीए क्षेत्रातील विविध भागांना मेट्रोने जोडण्याचं नियोजन आहे. सर्व प्रस्तावित मार्गिका पूर्ण झाल्यानंतर शहरात सुमारे 120 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क उपलब्ध होणार आहे. पीएमआर ग्रोथ सेंटरसाठी केंद्राकडून 5 हजार कोटी रुपये मिळणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांच्या मदतीवरून विरोधकांना सुनावलं-
शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या 5 हजार रुपयांच्या मदतीवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मोठ्या गाड्यांमध्ये फिरणाऱ्या आणि आलिशान घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना या रकमेचं महत्त्व समजणार नाही. मात्र, शेतीत नुकसान झालेल्या आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मदत नक्कीच मोलाची आहे.

शेतकऱ्यांना देण्यात येणारी ही अग्रीम मदत असून, त्यांना संकटातून सावरण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यापूर्वीच्या सरकारांच्या तुलनेत महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी अधिक मदत केली आहे. विरोधकांकडून टीका होत असली तरी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या निर्णयापासून सरकार मागे हटणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीची दखल घेत मदतीचं आश्वासन दिलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणाऱ्या मदतीचा उपयोग करून शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

आता फडणवीसांच्या या वक्तव्यावर विरोधक काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.