
नागपूर : शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत दोघांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ५२ ग्रॅम एमडी पावडरसह मोबाईल आणि दुचाकी असा एकूण २ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात एमडीचा पुरवठा करणाऱ्या अन्य तीन तस्करांची नावे समोर आली असून, त्यांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे भांडे प्लॉट चौकातील विशाल मेगा मार्टसमोरील सार्वजनिक रस्त्यालगत पोलिसांनी छापा टाकला. यावेळी संशयित सूरज कठाणे आणि हर्षल अबगड यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ५२ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. पोलिसांनी तीन मोबाईल फोन आणि एक दुचाकीही जप्त केली. या प्रकरणी सक्करदरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान अटक केलेल्या आरोपींना तीन जणांनी एमडीचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले असून, फरार पुरवठादारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.



