| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Aug 15th, 2018

  भारतीय भाषांचे ज्ञान मिळविण्यासाठी भारतीय व्यवहार कोष उपयोगी – राज्यपाल चे. विद्यासागर राव

  पुणे: भारतामध्ये विविध भाषा संस्कृती अनेक वर्षांपासून एकत्र नांदत आहेत. भाषा ही समाजाला जोडण्याचे काम करते. भारतीय भाषांचे ज्ञान मिळवण्यासाठी भारतीय व्यवहार कोष उपयोगी ठरेल, असे प्रतिपादन मा. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज केले.

  भारतीय विचार साधना, पुणे यांच्यातर्फे निर्मित तसेच दिवंगत विश्वनाथ नरवणे यांनी संपादित केलेल्या भारतीय व्यवहार कोषाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मा. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष किशोर शशितल सचिव राजन ढवळीकर, डेक्कन अभिमत विद्यापीठाचे उपकुलगुरु प्रसाद जोशी, हरिभाऊ मिरासदार आदी उपस्थित होते.

  राज्यपाल चे. विद्यासागर राव पुढे म्हणाले, भारतीय व्यवहार कोशामध्ये 16 भारतीय भाषांमधील 40 हजार शब्दांची माहिती आहे. यातील कोणत्याही भाषेतील व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी हा कोश उपयोगी पडणार आहे. कोशाची तिसरी आवृत्ती प्रकाशित करणे म्हणजेच संपादक विश्वनाथ नरवणे यांना अभिवादन करण्यासारखे आहे. विश्वनाथ नरवणे हे सहा वर्षे देशातील विविध भागात प्रवास करत होते. त्यांनी अनेक भाषातज्ज्ञांची भेट घेऊन कोश परिपूर्ण बनवला. याच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करताना आनंद होत असल्याचे श्री. राव यांनी सांगितले.

  यावेळी विश्वनाथ नरवणे यांच्या पत्नी कविता नरवणे यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला. प्रस्तावना किशोर शशितल यांनी केली. पुस्तक परिचय प्रसाद जोशी यांनी केले. तर आभार राजन ढवळीकर यांनी मानले. कार्यक्रमास राजेंद्र संगवी, दिगंबर घाटपांडे, शरद घाटपांडे, शरद थिटे, अस्मिता आसाट आदी मान्यवर उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145