Published On : Sat, Nov 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

हर्षवर्धन सपकाळ यांचा राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाखांची मदत देण्याची मागणी

Advertisement

हर्षवर्धन सपकाळ यांचा राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाखांची मदत देण्याची मागणी
पुणे : राज्यात दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार, अतिक्रमण कारवाई, गोकुळ दूध संघातील आर्थिक तूट आणि परिसीमन विधेयक अशा विविध मुद्द्यांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, शेतमालाचे भाव वाढवावेत आणि जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. कुंभमेळा आणि शक्तिपीठ महामार्गासारख्या प्रकल्पांवर खर्च होणारा निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरला पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.

राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत सपकाळ यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. शेतकरी संकटात असताना सरकारकडून त्यांना अपेक्षित मदत मिळत नसल्याची टीका त्यांनी केली. ‘राजा उदार झाला आणि शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्या’, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. राज्यातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला लक्ष्य करत पर्यावरणाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. बेरोजगारी, पर्यावरण आणि कथित बोगस मतदानाच्या मुद्द्यांवर काँग्रेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत लढा देत असून, ‘लोकशाही वाचवा’ हा पक्षाचा नारा असल्याचे त्यांनी सांगितले.

गोकुळ दूध संघाच्या कारभारावर बोलताना सपकाळ यांनी कोल्हापुरात सत्तेसाठी लोकशाहीची पायमल्ली झाल्याचा आरोप केला. दरम्यान, आमदार सतेज पाटील यांनीही गोकुळ दूध संघातील आर्थिक तुटीचा मुद्दा उपस्थित केला. दूध उत्पादकांना दरवाढ मिळावी, ही सर्वांची भूमिका असली तरी प्रशासकांच्या काळात झालेल्या आर्थिक नुकसानीची सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. पुढील बैठकीत संचालक या विषयावर चर्चा करतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यावरही सपकाळ यांनी टीका केली. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना आणि शेतकरी संकटात असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे दौऱ्यात नेमके काय केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्तेतील हिस्सेदारी आणि मागील काळातील भ्रष्टाचाराची वाटणी यासाठीच हा दौरा होता का, असा आरोपही त्यांनी केला. राज्याच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याऐवजी सत्ताधारी राजकीय समीकरणांमध्ये व्यस्त असल्याची टीका सपकाळ यांनी केली.

शहरातील अतिक्रमण कारवाईवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. अतिक्रमणाच्या नावाखाली नाटक सुरू असून, यापूर्वी अतिक्रमणधारकांकडून हप्ते कोण घेत होते, असा सवाल त्यांनी केला. भाजपच्या लोकांनी हप्ते घेतल्याचा आरोप करत शहरातील मूळ प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे सपकाळ म्हणाले.

Advertisement

परिसीमन विधेयकावर भूमिका स्पष्ट करत सपकाळ यांनी हे विधेयक राष्ट्रविरोधी आणि राष्ट्रविघातक असल्याचा आरोप केला. केवळ आमदार आणि खासदारांची संख्या वाढवून चालणार नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारही वाढवले पाहिजेत. ७३ वी आणि ७४ वी घटनादुरुस्ती लक्षात घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे; मात्र सरकार सत्ता केंद्रीकरणाच्या दिशेने काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पक्ष फोडणे, आमिष दाखवणे आणि परिसीमनाच्या माध्यमातून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करत महाविकास आघाडी महाराष्ट्रात एकत्र असून, राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीतील सर्व पक्ष या विधेयकाला विरोध करतील, असे त्यांनी सांगितले.

भाजपकडून हिंदू-मुस्लिम आणि भारत-पाकिस्तान मुद्द्यांवर चर्चा घडवून मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित केले जात असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. टिपू सुलतान यांच्या इतिहासाबाबत भाजपने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी करत त्यांनी टिपू सुलतान हे भारतातील योद्धे होते, असे म्हटले. आरएसएसच्या मासिकांमध्येही टिपू सुलतान यांचा आदर्श राजा म्हणून उल्लेख झाल्याचा दावा त्यांनी केला. या संदर्भात ठोस पुरावे असल्याचे सांगत व्हॉट्सॲपवर आधारित चर्चेपेक्षा पुराव्यांवर चर्चा व्हावी, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सपकाळ यांनी केली. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान, शेतमालाला वाढीव भाव, जनावरांसाठी चारा छावण्या, गावातील तरुणांना रोजगार आणि पाण्याचे नियोजन या उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार होऊ नये, यासाठीही योग्य देखरेख आवश्यक असल्याचे ते म्हणाले. राज्यावर अस्मानी आणि सुलतानी संकट असून, सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला.

अजित पवार यांच्या अपघात प्रकरणावरही सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केले. अपघातातील ब्लॅक बॉक्सची माहिती अद्याप समोर का आलेली नाही, अहवाल जाहीर करण्यास विलंब का होत आहे आणि हा अपघात होता की घातपात, याबाबत स्पष्टता का दिली जात नाही, असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणातील माहिती सार्वजनिक न झाल्याने नागरिकांच्या मनात शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.

आजची काँग्रेसची बैठक संघटनात्मक स्वरूपाची असून, जिल्हाध्यक्षांकडून संघटनेच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.