
नागपूर : उपराजधानी नागपुरात मध्यरात्री लुटमारीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळशी नगर परिसरात ३ ते ४ अज्ञात लुटारूंनी चाकूचा धाक दाखवत तब्बल ३ कोटी ७४ लाख रुपयांची रोकड असलेली कार पळवून नेली. या घटनेदरम्यान लुटारूंनी सुरक्षा रक्षकावर चाकूने वार करून त्याला जखमी केले. चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळशी नगर परिसरात राहणारे सुरेश परमार यांच्या घरातून त्यांचा चालक मोहन कुमार हा रोकड असलेली कार घेऊन बाहेर पडत होता. त्याचवेळी एका कारमधून आलेल्या ३ ते ४ अज्ञात आरोपींनी त्याचा रस्ता अडवला. त्यानंतर चालकाला मारहाण करत कारमधून खाली उतरण्यास भाग पाडले. हा प्रकार पाहून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. सुरक्षा रक्षकाला जखमी केल्यानंतर आरोपींनी चालकाला चाकूचा धाक दाखवत बाजूला केले आणि कोट्यवधींची रोकड असलेली कार घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
विशेष म्हणजे, कार पळवल्यानंतर आरोपींनी कामठी येथील खैरी शिवारात ती रस्त्याच्या कडेला सोडून दिली आणि तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींच्या येण्या-जाण्याच्या मार्गाचाही शोध घेतला जात आहे.
या लुटमारीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कारमध्ये एवढी मोठी रोकड असल्याची माहिती आरोपींना आधीपासूनच होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही रक्कम हवाला व्यवहाराशी संबंधित असल्याची चर्चा असली, तरी पोलिसांकडून याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे आरोपींनी आधीच रेकी केली होती की रोकड वाहतुकीची माहिती त्यांना कोणाकडून मिळाली, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, एवढ्या मोठ्या रकमेची माहिती आरोपींपर्यंत कशी पोहोचली, याचाही पोलीस शोध घेत आहेत. या लुटीमागे कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. ३ कोटी ७४ लाख रुपयांची रोकड लुटून नेणाऱ्या आरोपींचा शोध घेणे आणि संपूर्ण रक्कम हस्तगत करणे, हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.



