
गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने जुना भंडारा रोडवरील विक्रांत ट्रान्सपोर्ट गोडाऊन, स्मॉल फॅक्टरी एरिया येथे छापा टाकला. कारवाईदरम्यान गोडाऊनमध्ये 359 पोती सडकी सुपारी असा मोठा साठा आढळला. तपासात ही सुपारी पानमसाला व खर्रा तयार करण्यासाठी वापरली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, ती मानवी आरोग्यास घातक असल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत.
छापा मारल्यानंतर गुन्हे शाखेने पुढील तपासासाठी जप्त मुद्देमाल आणि संबंधित आरोपींना लकडगंज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. लकडगंज पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या साठ्यामागील पुरवठा साखळीचा शोध घेण्याचे काम गतीने सुरू आहे.
या यशस्वी कारवाईमुळे शहरातील सडकी सुपारीचा अवैध पुरवठा करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांच्या या ऑपरेशनमुळे आरोग्यविषयक गुन्ह्यांवर अंकुश बसण्यास मदत होईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
– रविकांत कांबळे









