
मुंबई : मुंबईत अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १२ कोटी २० लाख रुपये किमतीचे चरस जप्त केले आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वरळी युनिटने लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात ही कारवाई केली. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १२ किलो २०० ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आले आहे.
२४ नोव्हेंबरच्या रात्रीपासून २५ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १२ कोटी २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून करण्यात आला आणि त्यामागे कोणाचे जाळे कार्यरत आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. तस्करीचे मूळ शोधण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले असून या तपासातून मोठे आंतरराज्यीय तस्करी रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.


