
मुंबई : कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजप नेते गौरव भाटिया यांनी दिपके यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात तब्बल २ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणात सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये भाटिया यांनी मानहानीचा दावा दाखल केल्याची माहिती दिली. आरोप-प्रत्यारोपांचा हा वाद आता न्यायालयात पोहोचला असून, तथ्य, पुरावे आणि कायद्याच्या आधारे सत्य समोर येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
या वादाची सुरुवात ५ सप्टेंबर रोजी झाली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या एका बनावट चित्रफितीवरून हा वाद निर्माण झाला. या चित्रफितीत गौरव भाटिया यांच्या नावावर स्वातंत्र्य भारद्वाज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
यानंतर भाटिया यांनी संबंधित पोस्टबाबत माफी मागण्याची मागणी करत २४ तासांची मुदत दिली होती. सौरव दास यांनी ही पोस्ट नंतर हटवली. मात्र, त्याचवेळी त्यांनी भाजप नेत्यांना संबंधित वक्तव्य प्रत्यक्षात करण्याचं आव्हानही दिलं होतं.
पोस्ट हटवल्यानंतरही प्रकरण शांत झालं नाही. भाटिया यांनी पोस्ट हटवली असली तरी माफी मागण्यात आलेली नसल्याचं सांगत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. आता २ कोटींच्या मानहानी दाव्यामुळे हा वाद न्यायालयीन पातळीवर पोहोचला असून, सीजेपी आणि भाजपमधील हा संघर्ष पुढे कोणतं वळण घेतो, याकडे लक्ष लागलं आहे.




