नागपूर: अहिंसा आणि सहिष्णुता या संवेदनशील गुणांसह दानशूरता शिकविणाऱ्या भगवान महावीरांची शिकवण समाजाला उपकारक असून जैन बांधवांची सौहार्दपूर्ण वागणूक निश्चितच अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आज येथे केले. इतवारी येथील अहिंसा भवन कार्यालयात आयोजित जैन समाज स्नेहमिलन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
श्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की, देशात कुठलेही नैसर्गिक संकट येवो, आपत्ती येवो मदतीचा हात पुढे करणाऱ्यांमध्ये जैन बांधव मोठ्या संख्येने पुढे असतात गोरगरीब आणि गरजवंतांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने समाजातील संपन्न लोकांनी यथाशक्ती मदतीसाठी पुढे येणे ही आपली संस्कृती आहे. भगवान महावीर यांच्या विचारांचा वारसा घेऊन समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणारे जैन बांधव ही संस्कृती सातत्याने जपतात हे अधोरेखित करण्यासारखे आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्याने जैन बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो आहे राष्ट्रीय कार्यामध्ये नागपुरातही मोठ्या प्रमाणात जैन बांधव अग्रेसर असतात. आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अधिक कल्याणकारी कार्य पार पडतील अशा सदिच्छा नितीन गडकरी यांनी यावेळी जैन समाज संघटनेला दिल्या.
या संमेलनाला आमदार गिरीश व्यास आमदार विकास कुंभारे यांच्यासह प्रफुल्लभाई दोशी, मनीष जी मेहता नरेश जी पाटनी संतोष पेंढारी नरेंद्र कोठारी अनिल पारख सुमित लल्ला, सुभाष कोटेचा, पंकज भन्साली, राजेंद्र प्रसाद वैद, अजय वैद्य, निखिल कुसुमगर, सुरेंद्र लोढा, गणेश जैन, दीलीप राका आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 
			


 







 
			 
			
