मुंबई: सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञान उपयोगी ठरण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केली.
देशातील पहिल्या आर्टिफिशिअल इंटेलिजंस इन्स्टिट्यूटचे उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाले. मुंबई विद्यापीठाच्या ग्रीन टेक्नॉलॉजी सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि वाधवानी संस्थेचे रोमेश व सुनिल वाधवानी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून आर्टिफिशिअल इंटेलिजंस इन्स्टिट्यूट राष्ट्राला समर्पित करण्यात आले.
प्रधानमंत्री यावेळी म्हणाले की, ही संस्था म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र एकत्र येऊन कशा प्रकारे काम करते याचे उत्तम उदाहरण आहे. या संस्थेच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणारे संशोधन हे सामान्यांच्या कल्याणासाठी काम करेल. देशासमोरील विविध आव्हानांचे उच्चाटन करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजंसचा वापर करावा. भारतात अनेक भाषा आणि बोलीभाषा आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजंसच्या माध्यमातून असे एक तंत्रज्ञान विकसित करावे ज्याने भिन्न भाषेतील नागरिकांमध्ये सुसंवाद साधला जाईल. या विकसित तंत्रज्ञानाकडे आपण एक संधी म्हणून पाहूया असे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले.
देशातील दिव्यांग ही आपली संपत्ती असून आर्टिफिशिअल इंटेलिजंसच्या माध्यमातून त्यांना अधिक सक्षम कसे करता येईल या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तम आरोग्य सेवा, कृषीक्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या, लहरी हवामानाचा या क्षेत्राला बसणारा फटका त्यापासून शेतकऱ्याला वेळीच सतर्कतेचा इशारा देण्यासाठी अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. तसेच शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर प्रमाण सुधारण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळण्याकामी या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन सामान्यांना जेणेकरुन त्याचा फायदा होऊ शकेल काय यावर संशोधन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
डिजिटल इंडिया, भारतनेट यामुळे देशात डिजिटल क्रांती होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. कौशल्य विकास कार्यक्रमामुळे प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ तयार होत आहे. अटल इनोव्हेशनच्या मिशनच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे इनोव्हेशन हब तयार करण्याचा मानस पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजंस इन्स्टिट्यूट कार्य करेल असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
आर्टिफिशिअल इंटेलिजंसच्या माध्यमातून लोककल्याण व्हावे- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ग्रामीण भागात जेथे डॉक्टर आणि विशेषज्ज्ञ उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी आर्टिफिशिअल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित केलेले यंत्र बसविल्यास त्याचा फायदा सामान्यांना नक्की होईल. या माध्यमातून गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा तळागळातल्या नागरिकांना देता येईल. देशातील पहिले आर्टिफिशिअल इंटेलिजंस इन्स्टिट्यूट मुंबईत सुरू होत आहे याचा मला अभिमान वाटतो. आर्टिफिशिअल इंटेलिजंसच्या सहाय्याने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न होत आहे. ते अधिक सुकर करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
दोन वर्षांपूर्वी स्टार्टअप प्रदर्शनाला भेट दिली होती, त्याठिकाणी असे एक यंत्र बघितले की, त्याच्या सहाय्याने काही सेकंदामध्ये रेटिनाचे पन्नास हजार छायाचित्र काढली जातात आणि अवघ्या दोन-तीन मिनिटात रेटिनाला कुठला आजार आहे त्याचे निदान करणे शक्य होते, हे पाहून अचंबित झालो. असे यंत्र राज्यातील ग्रामीण भागात बसविल्यास नागरिकांना त्याचा फायदा होईल. आर्टीफिशिअल इंटेलिजेंस हे आधुनिक युगात मिळालेले वरदान असून त्या माध्यमातून सामान्यांचे जीवनमान अधिक सुखकर होईल. कृषी, आरोग्य, उद्योग या क्षेत्रात हे तंत्रज्ञान क्रांतीकारक बदल घडवून अधिक कुशल मनुष्यबळ विकसित करेल असा विश्वास व्यक्त करीत या क्षेत्रात मोठी गुंतवणूक अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आर्टीफिशिअल इंटेलिजेंसच्या क्षेत्रात अनेक अभिनव संशोधन अपेक्षित असून त्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळेल आणि त्याचा फायदा लोककल्याणासाठी होईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी वाधवानी संस्थेचे रोमेश व सुनिल वाधवानी मनोगत व्यक्त करीत ही संस्था सुरू करण्यामागची भूमिका मांडली.
राज्य शासन, मुंबई विद्यापीठ आणि वाधवानी आर्टीफिशिअल इंटेलिजेंस यांच्या माध्यमातून कलिना विद्यानगरी परिसरात देशातील पहिले आर्टिफिशिअल इंटेलिजंस इन्स्टिट्यूट उभारले आहे.
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शास्त्रज्ञ, कुलगुरू, आदी उपस्थित होते. यावेळी आर्टीफिशिअल इंटेलिजेंस संस्थेबाबत चित्रफित दाखविण्यात आली.
आर्टीफिशिअल इंटेलिजंस संस्थेविषयी:
या केंद्राच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील संशोधनावर, विशेषत: ग्रामीण, कृषी विकास, आरोग्य आणि शिक्षण अशा लोकोपयोगी विकासात्मक संशोधनावर अधिकाअधिक भर देण्यात येणार आहे. जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि मार्गदर्शन या केंद्रामार्फत पुरविले जाईल असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. सामाजिक समस्यांची उकल हे मूळ उद्दिष्ट ठेवून, फेलोशिप, संशोधन प्रकल्प, स्टुडेंट एक्चेंज प्रोग्राम, साईट व्हिजीट, अभ्यासक्रम निश्चिती, पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी लेक्चर्स असे अनुषंगिक कार्यक्रमांचे आयोजन वाधवानी इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र शासन आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने केले जाणार आहे. या केंद्राद्वारा राष्ट्रीय स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील सामाजिक हिताचे संशोधन आणि शिक्षण उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. या केंद्राच्या माध्यमातून भारतीय जीवनमान, लोककल्याणाबाबत विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.