
नागपूर: ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ मध्ये अग्रस्थानावर येण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध स्तरावर जनजागृती अभियान सुरू आहे. रविवारी (ता. १५) महाराजबाग येथे मनपाने ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सहकार्याने नागरिकांमध्ये ‘स्वच्छता ॲप’ विषयी जनजागृती करीत नागपूर स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचे आवाहन केले. यावेळी सुमारे २०० नागरिकांनी स्वच्छता ॲप डाऊनलोड केले.
यावेळी नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, नागपूर महानगरपालिकेचे ‘स्वच्छता ॲम्बेसेडर’ तथा ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी उपस्थित होते. स्वच्छता ॲम्बेसेडर कौस्तभ चॅटर्जी यांच्यासह ग्रीन व्हिजीलच्या सुमारे १५ स्वयंसेवकांनी महाराजबागमध्ये येणाऱ्या पर्यटकांना ‘स्वच्छता ॲप’ आणि ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’ याविषयी माहिती दिली. नागपूर शहर स्वच्छ आणि सुंदर करणे आता एका ‘क्लिक’वर शक्य आहे. आपल्या स्मार्ट फोनवर स्वच्छता ॲप डाऊनलोड करा. अस्वच्छतेविषयीच्या तक्रारी त्या कुठल्या भागातील आहे अशा माहितीसह अपलोड करा. १२ तासांच्या आत तक्रारींचे निराकरण होईल, अशी माहिती स्वयंसेवकांनी प्रत्येक नागरिकाला दिली. यावेळी सुमारे २०० नागरिकांनी ॲप डाऊनलोड केले तर सुमारे १०० नागरिकांना त्यावर फीडबॅक दिला.
या जनजागृती मोहिमेत ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सुरभी जैस्वाल, कल्याणी वैद्य, शीतल चौधरी, विष्णूदेव यादव, संजीवनी गोंदोडे, प्रिया यादव, अभय पौनिकर, सारंग मोरे, दादाराव मोहोड आदी स्वयंसेवकांचा समावेश होता.











