Published On : Fri, Dec 29th, 2017

थर्टी फ़स्टच्या रात्री लॉन, ढाबे महावितरणच्या रडारवर

Advertisement

नागपूर: सरत्या वर्षाला ‘गुड बाय’ करण्यासाठी आणि नूतन वर्षाचे भरभरून स्वागत करण्यासाठी नागपूर शहर आणि सभोवतालची हॉटेल्स, रिसॉर्ट्स, ढाबे आणि लॉन्स सज्ज झाली आहे. अनेक ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केल्या जात आहेत. ह्या कार्यक्रमात वीजेचा अनधिकृत वापर होऊ नये यासाठी महावितरणने विशेष उपाययोजना केल्या असून हा आनंद साजरा करताना वीजेचा अधिकृत वापर करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

नागपूर शहर आणि लगतच्या परिसरात अनेक लॉन, हॉटेल्स, रिसॉर्टस आणि ढाब्यांवर मनोरंजनासोबतच गायन, नृत्य, डीजे, बॉलिवूड नाईट, डिस्को, जॉझ, पॉप, इंटरनॅशनल साँग्स, पार्टीज, लाईव्ह बॅण्ड यासारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन केल्या जात आहे. अश्या कार्यक्रमांप्रसंगी अनेक ठिकाणी चोरीची वीज वापरल्या जात असल्याची माहिती असून त्यावर निर्बंध घालण्यासाठी महावितरणने अनेक उपाययोजना केल्या आहेत. अश्या कार्यक्रमाप्रसंगी वीजचोरी आढळल्यास वीजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासोबतच संबंधित आयोजकाचा परवाना रद्द्बातल करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावाही केला जाणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शहराबाहेरील अनेक ढाबाचालक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महामार्ग व रस्त्यांवर चोरीच्या वीजेवर आकर्षक रोषणाई करीत असल्याचीही माहिती असून मंडप डेकोरेशन व्यावसायिकांकडून वीज तारांवर आकडे टाकून देण्याची व्यवस्था केली जात असल्याचीही माहीती असून अश्या ढाबा आणि मंडप देकोरेशन व्यावसायिकांवर कठोर कारवाईसोबतच त्यांचाही व्यावसायिक परवाना रद्द करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याबाबत महावितरणची आग्रही भुमिका राहील.

31 डिसेंबर हा उत्सवाचा सण असून या दिवशी उत्सवप्रेमींच्या आनंदात विघ्न पडू नये यासाठी अधिकृत वीजेचाच वापर करण्यात येऊन आनंद व्दिगुणित करण्याचे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.