Published On : Wed, Apr 22nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

केतन ठाकरेची महापालिकेत एन्ट्री, नितीन राऊतांना धक्का

Advertisement

नागपूर : शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचे पुत्र केतन आता महापालिकेत नगरसेवक म्हणून दिसणार आहे. महापालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत महापौर नीता ठाकरे यांनी त्यांच्यासह ९ नव्या नामनिर्देशित नगरसेवकांच्या निवडीची घोषणा केली. त्यांची निवड माजीमंत्री व आमदार नितीन राऊत यांना जोरदार धक्का मानला जात आहे. केतन ठाकरे यांच्या अर्ज दाखल झाल्यानंतर नितीन राऊत यांनी राजीनाम्याची धमकी दिली होती.

स्वीकृत सदस्यपदासाठी काँग्रेसतर्फे शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे व अतुल कोटेचा यांनी अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल करताना नाट्यमय घटना घडली. माजी मंत्री व आमदार नितीन राऊत यांनी त्यांचे समर्थक बंडोपंत टेंभुर्णे यांना जाणीवपूर्वक डावलले असा आरोप करीत पक्षातून राजीनामा देण्याची धमकी दिली. त्यामुळे केतन ठाकरे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्षनेत्याकडे अर्ज मागे घेण्याबाबत विनंती पत्र दिले. परंतु एकदा अर्ज दाखल केल्यानंतर ते परत घेण्याची तरतूद महापालिकेत नसल्याने त्यांचा अर्ज कायम राहीला. मात्र, स्वीकृत सदस्य म्हणून घोषणा झाल्यानंतर ठाकरे राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, आज कॉंग्रेसचे अतुल कोटेचा यांच्या नावाचीही स्वीकृत सदस्य म्हणून घोषणा महापौरांनी केली.

Gold Rate
Apr 23 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,52,300 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,48,000/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महापालिकेत आता १६० सदस्य
महापालिकेचे नामनिर्देशित नगरसेवक म्हणून ९ सदस्यांची निवड झाल्याची घोषणा महापौर नीता ठाकरे यांनी केली. महापालिकेत निवडून आलेले १५१ नगरसेवक आहेत. त्यामुळे आता ही संख्या १६० पर्यंत पोहोचली. ३६ वर्षे दक्षिण नागपुरात भाजपच्या वाढीत प्रमुख भूमिका बजावणारे नेते संजय ठाकरे, सुबोध आचार्य, विनोद बघेल, जितेंद्र ठाकूर, रितेश गावंडे, शिवसेनेचे सूरज गोजे व काँग्रेसचे अतुल कोटेचा, केतन ठाकरे प्रथमच महापालिकेत पोहोचले. भाजपचे देवेंद्र मेहर यापूर्वी नगरसेवक होते.

लक्ष्मी हत्तीठेले सभापती
मागासवर्गीय नगरसेवकांची दुर्बल घटक समिती गठित करण्यात आली असून भाजपच्या लक्ष्मी हत्तीठेले यांची सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली. या समितीत भाजपचे योगेश पाचपोर, किरण मनपिया, तुषार लारोकर, दुर्गेश्वरी कोसेकर, योगेश मडावी व अमोल शामकुळे यांचा तर काँग्रेसचे मनीष बनसोड, विवेक निकोसे व सरस्वती सलामे यांचा समावेश आहे. मुस्लीम लीग-एमआयएमतर्फे वर्षा डोंगरे सदस्य आहे.

कृष्णा खोपडे समर्थक गोतमारे नासुप्रवर, एकात मतदान संघातून दोघे
नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळावर पूर्व नागपुरातील प्रभाग ४ चे नगरसेवक शेषराव गोतमारे यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून एक सदस्याची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महापौरांनी सभागृहात मांडला. सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर यांनी भाजपचे शेषराव गोतमारे यांचे नाव प्रस्तावित केले. या नावाला सभागृहाने एकमताने मंजुरी दिल्यानंतर महापौरांनी गोतमारे यांच्या नावाची घोषणा केली. गोतमारे प्रभाग ४ मधील नगरसेवक असून आमदार कृष्णा खोपडे समर्थक आहे. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे नासुप्रत विश्वस्त असून आता शेषराव गोतमारेही पूर्व नागपुरातून विश्वस्त झाले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement