
नागपूर : नाग नदीसह शहरातील पोरा, पिवळी नदी व नाल्यांची स्वच्छता मोहिम जोरात सुरू असून यातून निघणारा गाळाची दुर्गंधी अक्षरश: कंत्राटदारच नव्हे तर अधिकाऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचल्याचे बुधवारी महापालिकेच्या सभागृहात दिसून आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका आभा पांडे यांनी नदी स्वच्छतेत मोठा भ्रष्टाचार होत असून पोरा नदीतील गाळ काढून शेतकऱ्यांना कंत्राटदाराकडून विक्री केला जात असल्याचा आरोपामुळे आता गाळही पचवणे सुरू झाल्याची चर्चा रंगली.
महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी सुरेश भट सभागृहात पार पडली. प्रश्नोत्तराच्या तासात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आभा पांडे यांनी नदी, नाल्याच्या स्वच्छतेतून निघणारा गाळ व त्यासाठी महापालिकेच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०२१ मध्ये १० हजार १७५ टन गाळ काढण्यात आला. २०२२म्ध्ये ९ हजार १३० टन, २०२३ मध्ये ७,१६० टन गाळ काढण्यात आला. मात्र, २०२५ मध्ये १२ हजार टन गाळ काढण्यात आला. वर्षभरात गाळ दुप्पट कसा झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लोकसहभागातून नाग नदीसह तिन्ही नद्या व नाल्यांची स्वच्छता लोकसहभागातून केली जात होती. परंतु, महापालिका प्रशासनाने या उपक्रमाचे खाजगीकरण केले. नदी, नाले स्वच्छतेसाठी लोकसहभागातून यंत्रणा उभारली असता खर्च केवळ लाखात होता, मात्र भाड्याने यंत्रणा घेतल्यानंतर हा खर्च ५ कोटी ७२ लाखांवर गेला. महापालिका सभेत कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी हा खर्च केला जात असल्याच्या राष्ट्रवादी कॉ़ंग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेविकेच्या आरोपानंतर महापौर नीता ठाकरे यांनी खर्चाच्या तपासणीचे आदेश प्रशासनाला दिले. एवढेच नव्हे यापूर्वी लोकसहभागातून काम करताना नागपूर सुधार प्रन्यास, एनएमआरडीएकडून त्यांची यंत्रणा दिली जात होती. परंतु महापालिका प्रशासनाने त्यांच्या क्षेत्रातील नदी, नाल्यातील गाळ काढून कंत्राटदारांवर उधळपट्टी केली, असा आरोप त्यांनी केली. पोरा नदीतील गाळ शेतावर पोहोचवून त्यातून कंत्राटदार खिसे भरत असल्याचेही पांडे म्हणाल्या. नाले, नदी स्वच्छतेसाठी तरतुदीपेक्षा जास्त खर्च करण्यात आला. २० तास पोकलेन मशीन लावण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. परंतु, प्रत्यक्ष पाहणीत दर दीड तासाने चालक मशीन बंद करीत होता.
चौकशीसाठी गठीत करण्याची मागणी
काँग्रेसचे अभिजित झा यांनी २०२४ पासून विशिष्ट कंत्राटदारांना कामे देण्यात येत असून लोकसहभागातूनही कामे केली जात असून यात मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला. आभा पांडे यांनी प्रशासनाच्या तिजोरीतून जो खर्च करण्यात आला, ती रक्कम कार्यकारी अभियंत्यांच्या खिशातून वसूल करावी, चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठित करावी, अशी मागणी केली. चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीचा विचार करण्यात येईल, असे महापौर नीता ठाकरे यांनी सभेनंतर पत्रकार परिषदेत सांगितले.
कामाचे ऑडिट करणार
नदी, नाल्या स्वच्छतेवरील खर्चाच्या तपासणीचे तसेच कामाचे ऑडिच करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहे. चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्याचा विचारही असल्याचे महापौर नीता ठाकरे यांनी सभेनंतर सांगितले.








