
नागपूर :पाकिस्तानातून येणाऱ्या ‘झटपट गोरेपणा’ देण्याचा दावा करणाऱ्या क्रीमने नागपुरात अक्षरशः कहर माजवला आहे. या क्रीमच्या वापरामुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून थेट मूत्रपिंड निकामी होण्यापर्यंत परिस्थिती गेल्याचे उघड झाले आहे.
गेल्या दोन वर्षांत नागपूरातील एका रुग्णालयात तब्बल १८ महिलांना मूत्रपिंडाच्या विकारांचा फटका बसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, या क्रीममध्ये ‘पारा’सारखा विषारी धातू मोठ्या प्रमाणात असून तो त्वचेवाटे शरीरात जाऊन रक्तामध्ये मिसळतो आणि थेट किडनीवर आघात करतो.
नागपुरात या क्रीमची सर्रास विक्री होत असल्याचे समोर येताच अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने तात्काळ धडक कारवाई करत विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर क्रीमचा साठा जप्त करण्यात आला असून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
मल्लिका, झलक, गोरे, गोल्डन पर्ल, चांदणी, उजूबा, फेस फ्रेश, नूर हर्बल, न्यू फेस अशा विविध नावांनी ही क्रीम बाजारात विकली जात होती. यासोबतच काही सौंदर्य साबण आणि कथित व्हिटॅमिनयुक्त उत्पादनेही जप्त करण्यात आली.
या क्रीमचा वापर करणाऱ्यांना त्वचेवर जळजळ, सूज, डाग यांसारख्या समस्या जाणवत असल्या तरी खरा धोका आतून वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सुरुवातीला लक्षणे न दिसली तरी पुढे हा आजार जीवघेणा ठरू शकतो.
तज्ज्ञांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ‘फेअरनेस’च्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या अशा उत्पादनांपासून दूर राहणेच सुरक्षित आहे. कोणतेही सौंदर्यप्रसाधन वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.









