
नागपूर : शहरात अवैध तंबाखू तस्करीविरोधात क्राइम ब्रांचने मोठी कारवाई करत एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. क्राइम ब्रांच युनिट-5च्या पथकाने जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकत 9 लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित तंबाखू जप्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे जरीपटका परिसरातील हनुमान मंदिराजवळ सापळा रचण्यात आला. दरम्यान, संशयित चारचाकी वाहन अडवून तपासणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणात अवैध तंबाखू आढळून आला.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख मध्य प्रदेशातील बालाघाट येथील दिलीप कुमार गजभिये आणि जरीपटका येथील रूपेश जेठाण अशी आहे. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला तंबाखू हा रूपेश जेठाण याचाच असून तो शहरात अवैधरित्या पुरवठा करत असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी कारवाईदरम्यान 9,09,760 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू आणि एक चारचाकी वाहन असा एकूण 19,39,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सध्या पोलिसांकडून दोन्ही आरोपींकडून चौकशी सुरू असून या रॅकेटशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. क्राइम ब्रांच युनिट-5चे अधिकारी विनायक गोल्हे यांनी शहरातील अवैध तंबाखू व्यवसायाविरोधात कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.








