मुंबई – एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर पुन्हा एकदा ताण वाढल्याचे चित्र दिसून आले आहे. जागतिक परिस्थितीतील तणाव आणि वाढते उत्पादन खर्च यामुळे महागाईत भर पडत असून पेट्रोल, डिझेल, गॅससह आता दुधाच्या दरातही वाढ झाली आहे.
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक नियमांमध्ये बदल झाले असताना, दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमतीतही वाढ झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. विशेषतः दुधाच्या दरात प्रति लिटर २ ते ४ रुपयांची वाढ झाल्याची नोंद आहे.
मध्य प्रदेशातील इंदूर, भोपाळ, उज्जैन आणि जबलपूरसारख्या शहरांमध्ये ही दरवाढ प्रकर्षाने जाणवली. काही ठिकाणी पूर्वी ६० रुपये प्रति लिटर मिळणारे सुटे दूध आता ६३ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. स्थानिक परिस्थितीनुसार इतर शहरांमध्येही दरात वाढ झाली आहे.
दूध विक्रेत्यांच्या मते, वाढत्या इंधन दरांचा परिणाम वाहतूक खर्चावर झाला असून पशुखाद्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत हिरव्या चाऱ्याची कमतरता भासत असल्याने आणि जनावरांच्या दूध उत्पादनात घट होत असल्याने दरवाढ अपरिहार्य ठरली आहे.
दरम्यान, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या किमतीतही वाढ झाल्याने विमान वाहतूक क्षेत्रावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांमध्ये एटीएफ दर वाढल्याने विमान कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली आहे.
सरकारने मात्र देशात इंधनाचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. पेट्रोल पंप सुरळीत सुरू असून इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने कार्यरत असून एलपीजी उत्पादनातही वाढ करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.










