
नाशिक– येथील अशोक खरात प्रकरणाने आता राजकीय रंग घेतला असून, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या प्रकरणात नवे आरोप करत खळबळ उडवली आहे. त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरहे यांचे नाव घेत गंभीर दावे केले आहेत.
देसाई यांच्या मते, नीलम गोरहे या अशोक खरात यांच्या संपर्कात होत्या आणि त्यांनी नाशिकमधील एका हॉटेलमध्ये त्यांची भेट घेतल्याची माहिती असल्याचा दावा केला आहे. तसेच, खरात आणि गोरहे यांच्यात कौटुंबिक नातेसंबंध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, महिलांच्या प्रश्नांवर नेहमी भूमिका घेणाऱ्या गोरहे यांनी या प्रकरणावर अद्याप मौन बाळगल्याबद्दल देसाईंनी प्रश्न उपस्थित केले आहेत. गंभीर स्वरूपाच्या आरोपांवर प्रतिक्रिया का दिली जात नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.
या प्रकरणात अनेक तक्रारी समोर आल्या असून काही प्रकरणे लैंगिक छळाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, तसेच संभाव्य राजकीय संबंधांचीही तपासणी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.









