
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. “या विषयावर बोलण्यासाठी ही योग्य वेळ नाही. पक्षाच्या अध्यक्षा स्वतः याबाबत भूमिका मांडतील,” असे सांगत त्यांनी मौन बाळगले.
फडणवीस नागपुरात ६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली. “इंधन तुटवड्याच्या अफवा पसरवू नयेत,” असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
मेळाव्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, या संमेलनाला ऐतिहासिक महत्त्व असून पहिला मेळावा सुमारे ६९ वर्षांपूर्वी नागपुरातच झाला होता. यंदा पुन्हा एकदा शहराला यजमानपद मिळाले आहे. देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून सुमारे १,३०० पोलीस अधिकारी या मेळाव्यात सहभागी झाले आहेत.
दरम्यान, देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराबाबत विचारले असता, “पक्ष जिथे जबाबदारी देईल तिथे जाईन. आसाम आणि केरळमध्ये प्रचारासाठी जाणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अशोक खरात प्रकरणाबाबत विचारले असता, “या प्रकरणाची सध्या मला तपशीलवार माहिती नाही. तपास सुरू असून तो निष्पक्षपणे सुरू आहे. आवश्यक तेव्हाच माहिती दिली जाईल,” असे फडणवीस यांनी सांगितले.









