
नागपूर : आसाममधील कार्बी आंगलोंग परिसरात प्रशिक्षणादरम्यान भारतीय वायुसेनेचे सुखोई लढाऊ विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत नागपूरचा सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर शहीद झाले आहेत. या अपघातात त्यांच्यासोबत स्क्वाड्रन लीडर अनुज यांचाही मृत्यू झाला असल्याची अधिकृत पुष्टी भारतीय वायुसेनेकडून करण्यात आली आहे.
वायुसेनेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री १ वाजून ९ मिनिटांनी हे विमान अपघातग्रस्त झाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ९.१४ वाजता करण्यात आलेल्या अधिकृत पोस्टमध्ये दोन्ही पायलट शहीद झाल्याची माहिती देण्यात आली. अपघाताच्या वेळी हे लढाऊ विमान नियमित प्रशिक्षण उड्डाणावर होते. उड्डाणादरम्यान अचानक विमानाचा ग्राउंड कंट्रोलशी संपर्क तुटला आणि ते रडारवरून गायब झाले. यानंतर भारतीय वायुसेनेने तात्काळ शोधमोहीम सुरू केली असून, या दुर्घटनेच्या चौकशीसाठी विशेष पथक आसाममध्ये पाठवण्यात आले आहे. अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नागपूरच्या न्यू सुभेदार लेआउटचा रहिवासी
२८ वर्षीय पूर्वेश दुरुगकर हे नागपूरच्या न्यू सुभेदार लेआउट परिसरातील रहिवासी होते. लहानपणापासूनच त्यांना विमानचालनाची विशेष आवड होती. त्यांनी २०१५ मध्ये भंडारा येथील डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीमधून सैनिकी प्रशिक्षणासोबत अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१७ मध्ये नागपूरच्या आंबेडकर महाविद्यालयातून बीएससी पदवी प्राप्त केली.
यानंतर त्यांनी AFCAT परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय वायुसेनेत प्रवेश मिळवला आणि फायटर पायलट म्हणून देशसेवेत दाखल झाले. त्यांच्या शिक्षक नरेंद्र पलांदूरकर यांनी सांगितले की, पूर्वेश लहानपणापासूनच विमान आणि तंत्रज्ञानाबाबत उत्सुक होता. तो स्वतः लहान-मोठे ड्रोन तयार करत असे. याच आवडीमुळे पुढे त्याने हवाई दलात करिअर घडवले.
अलीकडील मोहिमेतही बजावली होती भूमिका
अलीकडील ऑपरेशन सिंदूर मोहिमेतही पूर्वेश दुरुगकर यांनी फायटर पायलट म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या शौर्यामुळे कुटुंबीयांसह नागपूरकरांना त्यांचा मोठा अभिमान होता.
कुटुंबीयांशी झालेले अखेरचे संभाषण
पूर्वेश हे २० फेब्रुवारी रोजी नागपूरला कुटुंबीयांच्या ‘फॅमिली गेट-टुगेदर’साठी आले होते. त्यांची बहीण सायली अमेरिकेत स्थायिक असून तीही त्या कार्यक्रमासाठी भारतात आली होती.
पूर्वेश यांचे वडील रवींद्र दुरुगकर हे रेल्वेमध्ये लोको पायलट होते. त्यांनी वर्षभरापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. आई संध्या दुरुगकर या गृहिणी आहेत. कुटुंबातील मुलगा रुपेशही भारतीय हवाई दलात कार्यरत आहे, तर मुलगी सायली ही IIT मुंबई येथून शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत कार्यरत आहे.
पूर्वेश कुटुंबीयांशी नियमितपणे व्हॉट्सअॅप कॉलद्वारे संवाद साधत असत. परवा रात्रीच त्यांचे कुटुंबीयांशी बोलणे झाले होते आणि तेच त्यांचे घरच्यांशी झालेले अखेरचे संभाषण ठरले.
या दुर्घटनेमुळे नागपूर शहरासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या वीर सुपुत्राला सर्व स्तरांतून श्रद्धांजली वाहिली जात आहे.








