चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. महापौर निवडणुकीतील पराभवानंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला. “मला जाणूनबुजून खलनायिका बनवण्यात आले. मात्र योग्य वेळी संपूर्ण सत्य जनतेसमोर मांडेन,” असा इशारा त्यांनी दिला.
Featured Products
बुधवारी धानोरकर यांनी काँग्रेस व मित्रपक्षांच्या निवडून आलेल्या तसेच पराभूत उमेदवारांसाठी स्नेहमेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला अनेक उमेदवार उपस्थित होते; मात्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटाने दूर राहणे पसंत केले. त्यामुळे पक्षातील मतभेद अधिक ठळकपणे समोर आले.
सभेत बोलताना धानोरकर म्हणाल्या, “राज्यात काँग्रेसची स्थिती कमकुवत असताना चंद्रपूरकरांनी पक्षावर विश्वास दाखवला. मात्र सत्तास्थापनेच्या वेळी काही तथाकथित ‘धर्मनिरपेक्ष’ पक्षांनी आणि घरातीलच काही हितशत्रूंनी माझ्याविरोधात कट रचला.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, दिल्लीतील पक्षश्रेष्ठी विशेषतः प्रियांका गांधी आणि वेणुगोपाल यांनी स्पष्ट निर्देश दिले होते की महापौर पद काँग्रेसकडे यावे, अन्यथा पक्षाने सक्षम विरोधी बाकांवर बसावे. “तरीही काही स्वार्थी प्रवृत्तीमुळे पक्षाची संधी दवडली गेली,” असा आरोप त्यांनी केला.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. निकालानुसार काँग्रेसला २७, भाजपला २३, शिवसेना (उद्धव गट) ६, शिवसेना १, बसपा १ आणि अन्य ८ जागा मिळाल्या होत्या. तरीही महापौरपद काँग्रेसच्या हाती आले नाही. चुरशीच्या लढतीत केवळ एका मताने भाजपच्या संगीता खांडेकर महापौरपदी निवडून आल्या.
महापौर निवडणुकीतील पराभवासाठी धानोरकर यांना जबाबदार धरले जात असताना त्यांच्या या वक्तव्यामुळे चंद्रपूरच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. “कथा अजून संपलेली नाही,” असा सूचक इशारा देत धानोरकर यांनी मोठा खुलासा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.









