
नागपूर : बारावीच्या परीक्षेदरम्यान नागपुरातील एका परीक्षा केंद्रावर सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब झाल्याची गंभीर बाब समोर आली असून, या प्रकरणाची पेपरफुटीशी सांगड घातली जात आहे. त्यामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित केंद्रावर आलेल्या लिफाफ्यात २५ प्रश्नपत्रिका असणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात २४ प्रश्नपत्रिकाच आढळून आल्या. फिजिक्स, केमेस्ट्री, गणित आणि बायोलॉजी या महत्त्वाच्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांबाबत ही तफावत दिसून आली. लिफाफा सीलबंद अवस्थेत असतानाच प्रश्नपत्रिका कमी कशा पडल्या, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
ही बाब उघड होताच केंद्रप्रमुख आणि पर्यवेक्षकांनी तातडीने बोर्ड अधिकाऱ्यांना कळवले. पर्यवेक्षकांकडून सविस्तर अहवाल सादर करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या प्रकाराची पेपरफुटी प्रकरणाशी जोडणी केली जात असल्याने संशय अधिक गडद झाला आहे. प्रश्नपत्रिका वितरण साखळीत कुठे त्रुटी झाली का, की यामागे संगनमताचा प्रकार आहे, याचा तपास केला जात आहे.
विद्यार्थ्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागली असली तरी पर्यायी व्यवस्था करून परीक्षा पार पाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेमुळे परीक्षा प्रक्रियेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शिक्षण मंडळाकडून अधिकृत स्पष्टीकरणाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








