
नागपूर -राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता अखेर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महिलांना दिलासा मिळाला असून आता पुढील हप्त्याबाबत उत्सुकता वाढली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने जानेवारी महिन्याची आर्थिक मदत वितरित करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर प्रक्रिया वेगाने राबवण्यात आली. सामाजिक न्याय विभागाकडून १८ फेब्रुवारी रोजी महिला व बालविकास विभागाकडे तब्बल ९८ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला होता. निधी प्राप्त होताच लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यास सुरुवात करण्यात आली. यापूर्वी डिसेंबर २०२५ चा हप्ता जानेवारीत जमा करण्यात आला होता, तर आता जानेवारीचा हप्ता फेब्रुवारी अखेरीस वर्ग झाला आहे.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांकडून चौकशी सुरू असून शासनाकडून स्पष्ट वेळापत्रक जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची केल्यानंतर अनेक लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. तांत्रिक अडचणींमुळे काही महिलांना प्रक्रिया पूर्ण करता आलेली नसल्याने ई-केवायसीसाठीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. जुलै २०२४ पासून सुरू असलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जात आहेत. पात्रतेच्या निकषात न बसणाऱ्या आणि ई-केवायसी अपूर्ण असलेल्या महिलांना मात्र लाभातून वगळण्यात आले आहे.








