
नागपूर : बारावीच्या परीक्षेनंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या दहावीच्या परीक्षेला आज, शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. नागपूर जिल्ह्यातील ५८ हजार ४५८ विद्यार्थी यंदा परीक्षेला बसणार असून यासाठी २२२ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत २ हजार ३६८ ने वाढ झाली आहे.
आजचा पहिला पेपर मराठी (प्रथम भाषा) विषयाचा असून सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
जिल्ह्यातील २९ परीक्षा केंद्रे अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. प्रश्नपत्रिकांची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी ८४ गुप्त केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा कॉपीमुक्त आणि सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागाने सहा भरारी पथके नियुक्त केली आहेत. या पथकांमध्ये शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी दोन पथकांचा समावेश असेल.
परीक्षा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल फोन, कॅल्क्युलेटर, डिजिटल घड्याळ, कागदी चिठ्ठ्या, गाईड किंवा इतर कोणतेही अनुचित साहित्य नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे देखरेख ठेवण्यात येणार असून गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. परीक्षा काळात पालकांनीही विद्यार्थ्यांना वेळेवर केंद्रावर पोहोचवावे व शिस्त पाळावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.








