वर्धा : वर्धा-नागपूर रेल्वे मार्गावर मंगळवारी (दि. १७ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास धावत्या Grand Expressच्या एका बोगीत अचानक भीषण आग भडकली. तुळजापूर स्थानकाजवळ दहेगाव गोसावी परिसरातील हेलोडी येथे घडलेल्या या घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. आगीमुळे संबंधित डबा पूर्णपणे जळून खाक झाला; मात्र वेळेत घेतलेल्या निर्णयांमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले.
Featured Products
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी नियोजित मार्गाने पुढे जात असताना एका डब्यातून धूर बाहेर येत असल्याचे काही प्रवाशांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला किरकोळ बिघाड वाटणारा प्रकार काही मिनिटांतच गंभीर झाला आणि आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण बोगीला वेढले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच चालकाने गाडी थांबवत प्रसंगावधान दाखवले.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ संबंधित डबा रिकामा करून प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवले. लगतच्या बोग्यांतील प्रवाशांनाही खबरदारी म्हणून खाली उतरवण्यात आले. दरम्यान, अग्निशमन दल व रेल्वेच्या आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. तथापि, तोपर्यंत बोगीचे मोठे नुकसान झाले होते.
आग लागण्यामागील अचूक कारण अद्याप समोर आलेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, विद्युत यंत्रणेत बिघाड किंवा शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून तज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे.
या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. सुदैवाने जीवितहानी टळल्याने प्रवासी आणि प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दरम्यान, घटनेचे दृश्ये समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित होत असून रेल्वे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.









