
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा २८ जानेवारी रोजी झालेला भीषण अपघात अद्यापही गूढतेच्या सावटाखाली आहे. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मुंबईहून बारामतीकडे निघालेले त्यांचे विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना नियंत्रण सुटल्याने थेट जमिनीवर आदळले. धडकेनंतर मोठा स्फोट होऊन विमानाला क्षणात आग लागली होती.
अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी घटनास्थळावरून विमानातील ब्लॅकबॉक्स हस्तगत करण्यात आला. मात्र हा ब्लॅकबॉक्स अंशतः जळालेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे त्यातील महत्त्वाचा डेटा सुरक्षित आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
डेटा पुनर्प्राप्तीसाठी परदेशाचा पर्याय?
ब्लॅकबॉक्समधील माहिती मिळवण्यासाठी अत्याधुनिक तांत्रिक प्रक्रियेची आवश्यकता असते. जळालेल्या अवस्थेमुळे डेटा वाचवण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाची गरज भासू शकते. यासाठी संबंधित यंत्रणा हा ब्लॅकबॉक्स परदेशातील प्रगत प्रयोगशाळेत पाठवण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. केंद्र सरकार याबाबत पुढील एक-दोन दिवसांत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपघाताबाबत निर्माण झालेल्या शंका-
दरम्यान, या अपघाताच्या कारणांबाबत विविध स्तरावरून शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे ब्लॅकबॉक्समधील ध्वनिमुद्रण आणि उड्डाणाशी संबंधित तांत्रिक नोंदी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. पायलट आणि नियंत्रण कक्षातील संवाद, विमानाची गती, उंची, इंजिनची स्थिती यासारखी माहिती या उपकरणातून समोर येऊ शकते.
ब्लॅकबॉक्समधील डेटा यशस्वीपणे पुनर्प्राप्त झाल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता या तांत्रिक तपासणी अहवालाकडे लागले आहे.








