
नागपूर – राजस्थानातील भिवाडी औद्योगिक परिसरात आज (दि. १६) सकाळी एका केमिकल फॅक्टरीत भीषण आग लागून सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खुसखेडा-करौली औद्योगिक क्षेत्रातील या घटनेमुळे संपूर्ण भागात हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळी सुमारे ९.३० वाजता कारखान्यात काम सुरू असतानाच अचानक आग भडकली. त्या वेळी सुमारे २५ कामगार आत काम करत होते. आग इतक्या वेगाने पसरली की अनेकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. प्रशासनाच्या माहितीनुसार, पोलिसांना पेट्रोलिंगदरम्यान घटनेची माहिती मिळाली आणि तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
दीड तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात-
आगीची माहिती मिळताच खुसखेडा आणि भिवाडी रिको येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कारखान्यात ज्वलनशील रसायनांचा मोठा साठा असल्याने ज्वाळा प्रचंड उसळल्या होत्या. सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
आग विझवल्यानंतर बचाव पथकाने आत प्रवेश केला असता जळालेल्या अवस्थेतील कामगारांचे सांगाडे आढळले. मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले असून त्यांना काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आले.
दोन कामगार बेपत्ता; चौकशी सुरू-
प्रशासनाने सात जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी केली असून दोन कामगार अजूनही बेपत्ता आहेत. ढिगाऱ्याखाली त्यांचा शोध सुरू आहे. तिजारा उपविभागाचे डीएसपी शिवराज सिंह घटनास्थळी उपस्थित असून सखोल तपास सुरू आहे. भिवाडीचे एसपी आणि एडीएम देखील पाहणी करणार आहेत.
कारखान्यातील सुरक्षा उपाययोजना, ज्वलनशील रसायनांची हाताळणी आणि आग प्रतिबंधक नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी प्रशासनाकडून केली जात आहे.
अलिकडेच अबू रोड येथेही जाळपोळीत आई व चार महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे औद्योगिक वसाहतींमधील सुरक्षाव्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भिवाडीतील या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.








