
नागपूर : शहरातील अंबाझरी तलावाच्या पाण्यावर पसरलेल्या जलपर्णीमुळे सौंदर्य आणि पर्यावरणाला निर्माण झालेल्या धोक्याचे रूपांतर आता संधीमध्ये झाले आहे. उपद्रवी जलपर्णीतून टिकाऊ आणि आकर्षक हस्तशिल्प वस्तू तयार करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात येत असून, यामुळे तलाव स्वच्छतेसह महिलांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे.
‘विड टू वेल्थ’ या संस्थेच्या माध्यमातून स्वाती धोटकर यांनी हा प्रकल्प साकारला आहे. यापूर्वी चंद्रपूरमध्ये यशस्वी ठरलेला हा प्रयोग आता नागपूरमध्येही राबविण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कौशल्य विकास केंद्रात महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. आतापर्यंत अंबाझरी तलावातील सुमारे एक एकर परिसरातील जलपर्णी काढून त्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे.
जलपर्णीचे देठ, पाने आणि मुळे वेगळी करून ती उन्हात वाळवली जातात. त्यानंतर त्यापासून विविध उपयुक्त वस्तू तयार केल्या जातात. प्रशिक्षण घेतलेल्या सुमारे १०० महिलांनी ८०० हून अधिक वस्तू तयार केल्या आहेत. यामध्ये दैनंदिन वापरातील पिशव्या, योगासाठी चटया, फाईल कव्हर, पर्स आदी वस्तूंचा समावेश आहे. पर्यावरणपूरक आणि हाताने तयार केलेल्या या वस्तूंना प्रदर्शनांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनंतर या उपक्रमासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात आली. अलीकडेच प्रकल्पाच्या प्रमुखांनी गडकरी यांची भेट घेऊन कामकाजाची माहिती दिली. या वेळी त्यांनी प्रकल्पाचे कौतुक करत योग्य विपणन आणि ओळख मिळाल्यास हा उपक्रम जागतिक स्तरावरही पोहोचू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.
जलपर्णी ही अतिशय वेगाने वाढणारी वनस्पती असून ती तलावातील ऑक्सिजनचे प्रमाण घटवते. त्यामुळे मासे आणि इतर जलचरांना धोका निर्माण होतो. तसेच पाण्याचे मोठ्या प्रमाणात शोषण होत असल्याने तलाव हळूहळू कोरडे पडण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत केवळ जलपर्णी काढून टाकणे हा तात्पुरता उपाय ठरतो. मात्र, तिचाच कच्चा माल म्हणून वापर करून हस्तशिल्प निर्मिती केल्यास पर्यावरण संवर्धनासोबत आर्थिक उत्पन्नाचाही मार्ग खुला होतो.
‘टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनेला मूर्त रूप देणारा हा उपक्रम नागपूरसाठी पर्यावरण आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.








